लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : साथीच्या आजारांनी आता डोके वर काढले असल्याने नागरिकांनी अत्यंत सतर्क राहण्याची आवश्यकता आहे. डेेंग्यू, चिकुनगुनिया, मलेरिया यांसारख्या आजारांचा दंश नागरिकांसाठी असह्य होत आहे. आरोग्य विभागाने दिलेल्या सूचनांचे पालन करून नागरिकांना या साथीच्या आजारातून स्वत:ची सुटका करून घेता येऊ शकते.
सांगली जिल्ह्यात ऑगस्ट महिन्यात डेंग्यूने हैराण केले. जिल्ह्यातील ग्रामीण भागातील नागरिकांनाही याचा त्रास होत आहे. साथीच्या आजारांमध्ये सर्वाधिक रुग्ण हे डेंग्यूचे असल्याचे दिसून आले आहे. त्याखालोखाल चिकुनगुणिया व मलेरिया रुग्णांचा क्रमांक लागतो. मिरजेतील इदगाहनगर, कृष्णाघाट परिसरात सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत. तुलनेते सांगली, कुपवाडमध्ये रुग्ण कमी असले तरी त्यांचे अस्तित्व दिसत आहे. महापालिका, तसेच जिल्हा आरोग्य विभागामार्फत सर्वेक्षण, औषध फवारणी यासारखे उपाय केले जात आहेत.
चौकट
महापालिका क्षेत्रातील डेंग्यूचे रुग्ण
जानेवारी ते ऑगस्ट २६०
ऑगस्ट ८९
१५ सप्टेंबरपर्यंत ५
चौकट
काय आहेत लक्षणे
डेंग्यू : २ ते ७ दिवस तीव्र ताप डोकेदुखी, सांधेदुखी, कंबरदुखी, डोळ्याच्या खोबण्या दुखणे, अंत:त्वचा, नाक-तोंड इत्यादीतून रक्तस्राव, अंगावर पुरळ येणे, त्वचा थंड व निस्तेज होणे, रक्तदाब कमी होणे. डेंग्यू फिव्हर, डेंग्यू हिमोरिजिक फिव्हर (रक्तस्रावित रुग्ण), डेंग्यू शॉक सिंड्रोम या तीन प्रकारचे रुग्ण आढळतात.
चिकुनगुणिया : तीव्र ताप, तीव्र सांधेदुखी, अंगदुखी, मळमळ, अंगावर पुरळ येणे, तीव्र डोकेदुखी ही प्रमुख लक्षणे आहेत. सर्व वयोगटांत हा रोग आढळून येतो. दूषित एडिज एजिप्टाय हा डास चावल्यानंतर निरोगी व्यक्तीला हा रोग होऊ शकतो.
काविळ : त्वचा, नखं, डोळ्यांचा पांढरा असलेला भाग पिवळसर दिसायला लागतो. पोट दुखणे, भूक न लागणे, अपचन होणे, वजन कमी होणे, थकवा येणे, मूत्राचा रंग पिवळा होणे, ताप येणे, हातांवर खाज येणे आदी लक्षणे दिसतात.
चौकट
लहान मुलांचे प्रमाण जास्त
सध्या डेंग्यू रुग्णांमध्ये लहान मुलांचेही प्रमाण मागील वर्षापेक्षा जास्त दिसत आहे. याबाबतची आकडेवारी आरोग्य विभागाकडे उपलब्ध नसली, तरी वैद्यकीय तज्ज्ञांनी त्याबाबत निरीक्षणे नोंदविली आहेत.
चौकट
म्हैसाळला दररोज १० रुग्ण
ऑगस्ट महिन्यात मिरज तालुक्यातील म्हैसाळ येथे डेंग्यू व चिकुनगुणियाचे दररोज १० रुग्ण आढळत होते. यातील जवळपास ८ रुग्ण डेंग्यूचे होते. मिरजेतील इदगाहनगर, कृष्णाघाट, वारणाली याठिकाणी डेंग्यूचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर आढळले. सध्या महापालिका क्षेत्रात डेंग्यूचे पाच रुग्ण आहेत.
कोट
डेंग्यू, चिकुनगुणिया आजाराबाबत नागरिकांनी सतर्क राहावे. महापालिकेने दिलेल्या सूचनांचे पालन करावे. आयुक्त नितीन कापडणीस यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिकेमार्फतही सर्वत्र सर्वेक्षण व उपाययोजना सुर आहेत.
- डॉ. रवींद्र ताटे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी, सांगली