सांगली : संगणकीकरणाच्या माध्यमातून जिल्हा बँकेतील तत्कालीन संचालक मंडळाने केलेला गोलमाल जिल्हा बँकेला ७३ लाख ६७ हजारांचा झटका देऊन गेला. निविदा प्रक्रियेत नियमांना हरताळ फासून मनमानी पद्धतीने ठराव करण्यात आले. त्याची अंमलबजावणी प्रशासकीय स्तरावर करण्यात आली. त्यामुळे तत्कालीन संचालक व अधिकाऱ्यांना हे प्रकरण अंगलट येण्याची चिन्हे आहेत. सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या मोठ्या शाखांमध्ये संगणक बसविण्यासाठी जाहिरात देण्यात आली. मुदतीत आलेल्या तीन निविदांपैकी सर्वात कमी दराच्या दोन निविदाधारकांकडून काम करण्याचे निश्चित झाले. यामध्ये सांगलीच्या मिथीकॉम व लोटस कॉम्प्युटर्सचा समावेश होता. या दोन्ही निविदाधारकांकडून संगणक खरेदीचा निर्णय ४ आॅक्टोबर २000 रोजी झाला. सुरुवातीला १२ शाखांसाठी संगणक खरेदीचा ठराव झाला. त्यानंतर पुन्हा १४ मे २00१ रोजी १७ शाखांसाठी जुन्या दराने लोटस कॉम्प्युटर्स यांच्याकडूनच संगणक खरेदीचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी १ कोटी १८ लाख ९ हजार २00 रुपयांची आॅर्डर देण्यात आली. नव्याने संगणक खरेदी करताना पुन्हा निविदा प्रक्रिया राबविण्याची गरज असताना संचालक मंडळाने त्याच संस्थेला पूर्वीच्या दराने काम दिले. संगणक खरेदीचा हा सिलसिला तसाच पुढे चालू राहिला. ६ जुलै २00१ रोजी पुन्हा ११ शाखांसाठी जुन्या दरातच संगणक खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला. १२ नोव्हेंबर २00१ रोजी पुन्हा ८ शाखांसाठी मिथीकॉम कॉम्प्युटर्सला जुन्या दरातच आॅर्डर देण्यात आली. यावेळीही फेर दरपत्रके मागविण्यात आली नाहीत. याप्रकरणी चौकशी अधिकाऱ्यांनी सर्व कागदपत्रांची व ठरावांची तपासणी केली. निष्कर्षात म्हटले आहे की, वेगवेगळ्या तारखांना संगणक खरेदीचे आदेश देण्यात आले. मिथीकॉम व लोटस या संस्थांशी करार करण्यात आलेला नाही. खरेदीसाठी तज्ज्ञ सल्लागारांची नेमणूकही केलेली नाही. वेळोवेळी एकाच दराने संगणक खरेदी करण्यात आली. फेरनिविदा मागवून दरपत्रके न मागविल्यामुळे खरेदी योग्य व रास्त दरात झाली, असे म्हणता येत नाही. आलेल्या कोटेशन्समध्ये लोटस व सावंत टेक्नॉलॉजी या दोन्ही कंपन्या एकाच मालकाच्या असल्याचे दिसून येते. त्यांच्या लेटरहेडवरील पत्ता व दूरध्वनी क्रमांक एकच आहे. त्यामुळे स्वतंत्र तीन कंपन्यांकडून निविदा न मागविता दोनच कंपन्यांच्या कोटेशनवर संगणक खरेदीचा निर्णय घेतल्याचे दिसून येते, असे आरोपपत्रात व यापूर्वीच्या अहवालात स्पष्टपणे नमूद केले आहे. (प्रतिनिधी)संगणकाचे नुकसान गुलदस्त्यातसंगणक खरेदीचे त्यावेळचे व आताचे दर उपलब्ध होऊ न शकल्याने चौकशी अधिकाऱ्यांनी संगणक खरेदीत नेमके किती नुकसान झाले, हे स्पष्ट केले नाही. या प्रक्रियेवेळी १0६ पासबुक प्रिंटर्सची खरेदी करण्यात आली होती. प्रति प्रिंटर ५९ हजार ५00 रुपयांनी एकूण ७३ लाख ६७ हजाराचा खरेदी व्यवहार झाला. या प्रिंटर्सचा वापर बँकेने केलेला नाही. त्यामुळे आवश्यकता नसताना झालेल्या या खरेदीची रक्कम नुकसान म्हणून गृहीत धरण्यात आली आहे. हाच खर्च आता तत्कालीन संचालक मंडळ व अधिकाऱ्यांच्या अंगलट येणार आहे.
संगणक खरेदी व्यवहारात बँकेला सूचना
By admin | Updated: September 13, 2015 22:51 IST