लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : बारा हजार रुपयांचा मोबाईल केवळ १ हजार २०० रुपयांना देण्याचे आमिष दाखवून ऑनलाईन शॉपिंग करणाऱ्यांच्या खिशावर डल्ला मारला जात आहे. अनेक बोगस संकेतस्थळांनी फसवणुकीचा हा नवा फंडा शोधला आहे. यातून हजारो तरुणांची फसवणूक होत असून, तक्रारींपासूनही ते दूर पळत आहेत.
महागड्या रकमेचे मोबाईल अगदी १० टक्के रकमेत मिळत असल्याने ग्राहक सहज बळी पडतात. ही रक्कम किरकोळ असल्याने त्याचे ऑनलाईन पेमेंट करुन ग्राहक मोकळे होतात. त्यानंतर फसवणूक झाली तरी रक्कम किरकोळ आहे म्हणून ही फसवणूक लपविण्याचा प्रयत्न करतात, मात्र यातून कोट्यवधी रुपयांची सामूहिक फसवणूक होत आहे. बोगस संकेतस्थळांबाबत अजूनही लोक सतर्क नसल्याचा हा परिणाम आहे.
चौकट
या वेबसाईटपासून रहा सावधान
‘स्पेअरनकार्ट’ नावाने एक संकेतस्थळ इंटरनेटवर फसवणुकीसाठी प्रसिद्ध होत आहे. यावर अनेक सवलती दिल्या गेल्याने लोक त्यांच्या जाळ्यात ओढले जात आहेत. ‘कम्पलेंट डॉट कॉम’ या संकेतस्थळावर स्पेअरकार्टविषयीच्या तक्रारींचा पाऊस पडत आहे. इंटरनेटवर या संकेतस्थळाविषयी असंख्य प्रश्न विचारले जात आहेत. कंपनीचा मालक कोण, त्याचा पत्ता, संपर्क क्रमांक असे काहीही यावर नाही.
कोट
स्पेअरनकार्टवर मोबाईल खरेदीसाठी १ हजार २०० रुपये भरले होते. त्यानंतर ना मोबाईल मिळाला, ना पैसे. याविषयीची तक्रार सायबर क्राईमकडे करणार आहे. कंपनीचे संपर्क क्रमांकही बोगस आहेत.
- श्रीनिवास नांद्रे, ग्राहक, मिरज
चौकट
महाराष्ट्रात २०२०मध्ये ऑनलाईन शॉपिंग फसवणुकीच्या घटना - २२७६
जानेवारी ते जून २०२१मध्ये सांगली जिल्ह्यात सायबर क्राईम सेलकडील तक्रारी २६
ऑनलाईन आर्थिक फसवणुकीच्या घटना १५
चौकट
अशी घ्या खबरदारी?
ऑनलाईन खरेदी करताना संबंधित संकेतस्थळ बोगस आहे की खरे असा प्रश्न टाकून सर्च करा.
संकेतस्थळ बोगस असेल तर त्याविषयीच्या बातम्या, माहिती तुम्हाला उपलब्ध होईल.
अनोळखी संकेतस्थळावरुन खरेदी करणे टाळा.
नामांकित कंपनीच्या संकेतस्थळावरुन दुसऱ्या कंपनीची लिंक उघडत असेल तर ती टाळा.
व्यवहारावेळी शक्यतो ‘कॅश ऑन डिलिव्हरी’ पर्याय निवडा.
फसवणूक झाल्यास लगेच सायबर क्राईम सेलकडे तक्रार करा.