कुपवाड : जिल्ह्यातील औद्योगिक क्षेत्रात प्रदूषणाचे प्रमाण वाढल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात येणार आहे. त्यामुळे उद्योजकांनी कारखान्यांमधून निर्माण होणाऱ्या प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण महामंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी एल. एस. भड यांनी उद्योजकांच्या बैठकीत व्यक्त केले. मिरज एमआयडीसीमधील सांगली, मिरज मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनच्यावतीने उद्योजकांना भेडसावणाऱ्या अडचणींची सोडवणूक करण्यासाठी मिरज एमआयडीसीमध्ये बुधवारी आयोजित बैठकीमध्ये ते बोलत होते. बैठकीस असोसिएशनचे माजी अध्यक्ष के. एस. भंडारे, सहसचिव माधव कुलकर्णी, उपाध्यक्ष विनोद पाटील, उद्योजक संजय खांबे प्रमुख उपस्थित होते. भड म्हणाले, प्रदूषणासंबंधीच्या कायद्यामध्ये सध्या बऱ्याच सुधारणा झाल्या आहेत. याची सखोल माहिती उद्योजकांनी घेणे गरजेचे आहे. प्रदूषण नियंत्रणाकडे दुर्लक्ष करू नये. एमआयडीसीमध्ये सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प होणे गरजेचे आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी मिरज एमआयडीसी क्षेत्रातील उद्योगासंबंधीच्या असणाऱ्या उद्योजकांच्या तक्रारी सामोपचाराने सोडविण्यात आल्या. माधव कुलकर्णी यांनी प्रदूषण प्रकाराची माहिती दिली. केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियानाच्या विविध संकल्पनांची माहिती दिली. हरित संकल्पनेची माहिती त्यांनी सविस्तर दिली. बैठकीस उद्योजक अरविंद जोशी, आर. डी. जाधव, प्रकाश शहा, राहुल देशपांडे, प्रवीण मजेठिया, व्यवस्थापक गणेश निकम आदी उपस्थित होते. (वार्ताहर)उद्योजकांच्या अडचणी सोडविणारमहापालिका, कामगार अधिकारी, विक्रीकर अधिकाऱ्यांना औद्योगिक वसाहतीमध्ये निमंत्रित करून उद्योजकांचे प्रश्न जाग्यावरच सोडविण्यास प्राधान्य दिले आहे. त्याचाच एक भाग म्हणून प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांना येथे बोलाविले असल्याचे माधव कुलकर्णी यांनी सांगितले. प्रदूषण अधिकाऱ्यांनी उद्योजकांचे अनेक प्रश्न सोडविल्यामुळे उद्योजकांनी समाधान व्यक्त केले.लोकअदालतीच्या धर्तीवर मिरज औद्योगिक वसाहतीमधील उद्योजकांचे विविध प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे उद्योजक माधव कुलकर्णी यांनी आश्वासन दिले.
उद्योजकांनी प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्याची गरज
By admin | Updated: August 19, 2015 22:29 IST