तासगाव : तासगाव नगरपालिकेतील काँग्रेसच्या नगराध्यक्षांची उचलबांगडी करण्यासाठी आबा आणि काका गटातील नगरसेवकांनी एकत्रित येऊन अविश्वास ठराव आणण्याचा निर्णय घेतला होता. मात्र राष्ट्रवादीत काका गटाला सोबत घेण्याच्या मुद्द्यावरून मतभेद झाल्याने नगराध्यक्ष बदलाच्या हालचाली तुर्तास मंदावल्या आहेत. तरीही राष्ट्रवादीतील नाराज आणि काका समर्थक नगरसेवक काय भूमिका घेणार? याबाबत सर्वांची उत्सुकता वाढली वाढली आहे. नगरपालिकेत आबा आणि काका गटाचे समान संख्याबळ आहे. राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर काँग्रेसचे एकमेव सदस्य नगराध्यक्ष झाले आहेत. राष्ट्रवादीतील नगराध्यक्षपदासाठी काहीजण इच्छुक असल्याने उर्वरित कालावधित दोन्ही गटात नगराध्यक्षपद वाटून घेण्याच्या मुद्द्यावरुन आबा आणि काका गट एकत्रित आले. नगराध्यक्षांना राजीनामा देण्यास सांगितला. अविश्वास ठराव आणण्याचा इशाराही दोन्ही गटातील नगरसेवकांनी दिला. मात्र त्यानंतर राजीनामा देणार नसल्याचे नगराध्यक्ष संजय पवार यांनी जाहीर करुन आबा-काका गटाच्या मनोमीलनावर सडकून टीका केली होती. त्यानंतर राष्ट्रवादीतच काका गटाच्या नगरसेवकांचा पाठिंबा घेण्यावरुन मतभेद निर्माण झाले. त्यामुळे नगराध्यक्षांच्या विरोधातील अविश्वास ठराव तुर्तास बारगळला आहे. तरीही नगराध्यक्षांची उचलबांगडी करण्यासाठी राष्ट्रवादीत धुसफूस अद्यापही सुरु आहे. तर भाजपने बेरजेचे राजकारण करण्यासाठी अविश्वास ठरावाला पाठिंब्याची भूमिका कायम ठेवली आहे. त्यामुळे राजकीय घडामोडींबाबत उत्सुकता वाढली आहे. (वार्ताहर)नगराध्यक्ष पदाचा राजीनामा देणार नसल्याची भूमिका मी यापूर्वीच स्पष्ट केली आहे. रविवारी विकास कामांच्या उद्घाटनानिमित्ताने आमदार सुमनताई पाटील यांच्याशी भेट झाली होती. त्यांनीही राजीनामा देण्यास सांगितलेला नाही. त्यामुळे राजीनामा देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. - अजय पवार, नगराध्यक्ष.
तासगाव नगराध्यक्ष बदलावरून राष्ट्रवादीमध्येच तीव्र मतभेद
By admin | Updated: August 31, 2015 21:54 IST