लाेकमत न्यूज नेटवर्क
कवठेमहांकाळ : तालुक्यात साेमवारी पार पडलेल्या ११ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला बळकटी मिळाली आहे, तर खासदार संजयकाका पाटील, माजी मंत्री अजितराव घोरपडे यांच्या गटावर आत्मचिंतनाची वेळ आली आहे. तालुक्यात काँग्रेस फक्त शहरातील कार्यालयापुरताच उरल्याचे चित्र ग्रामपंचायतीच्या निकालानंतर दिसून येत आहे.
सोमवारी तालुक्यातील ११ ग्रामपंचायतींचा निकाल जाहीर झाला. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने सहा ग्रामपंचायतींवर झेंडा फडकवला. खासदार संजयकाका पाटील यांच्या गटाला निमज आणि नांगोळे या दोन ग्रामपंचायती मिळवता आल्या, तर घोरपडे गटाला थबडेवाडी आणि चोरोची येथे विजय मिळाला. अजितराव घोरपडे गटाची इरळी आणि म्हैसाळ (एम) ही गावे राष्ट्रवादीने खेचून घेतली; तर थबडेवाडी हे गाव घोरपडे गटाला राष्ट्रवादीतील फुटीमुळे परत मिळवता आले.
तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणूक पक्षीय पातळीवर पन्नास टक्के आणि गावकी, भावकी व विरोधाला विरोध म्हणून पन्नास टक्के अशी लढली गेली. कोणत्याही गावात विकासाचा मुद्दा हा अजेंडा म्हणून समोर आला नाही. किंबहुना कोणत्याच राजकीय पक्षाने विकासाच्या मुद्द्यावर मते मागितली नाहीत.
निवडणुकीत काही गावांत राष्ट्रवादीला खासदार गटाचे कार्यकर्ते सामील झाले हाेते, तर काही गावात राष्ट्रवादीमध्येच फूट पडली. काही ठिकाणी घोरपडे गट विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना झाला. या निवडणुकीत खासदार पाटील व माजी मंत्री अजितराव घोरपडे यांच्यावर आत्मचिंतनाची वेळ आली आहे. कधीकाळी गावगाड्याच्या सत्तेत अजितराव घोरपडे कायम अग्रेसर असायचे. खासदार पाटील यांनीही मागील ग्रामपंचायत निवडणुकीत वरचष्मा गाजवला होता. परंतु या दोघांनाही या निवडणुकीत विचार करण्याची वेळ आली आहे.
चौकट
चोरोची येथे राष्ट्रवादीचे नेते सुरेश पाटील यांनी निवडणुकीत सक्रिय सहभाग घेत पॅनेल उभे केले होते. या गावात युवा नेते रोहित पाटील यांनी प्रचार सभाही घेतली. परंतु घोरपडे गटाचे राजाराम पाटील व स्थानिक आघाडीचे पांडुरंग यमगर यांनी या पॅनेलच्या उमेदवारांचे डिपॉझिट जप्त केले. त्यामुळे आबा काका गटाच्या युतीला जनतेने नाकारले असल्याची प्रतिक्रिया उमटत आहे. या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीच्या आमदार सुमनताई पाटील, रोहित पाटील, सुरेश पाटील, अनिताताई सगरे यांनी प्रयत्न केले, तर अजितराव घोरपडे यांच्या पहिल्या फळीतील कार्यकर्ते सक्रिय होते. काँग्रेस पक्षाने एकाही ठिकाणी निवडणूक लढवली नाही. त्यांना उमेदवार मिळणेसुद्धा मुश्किल झाले.