मिरज : मिरजेतील खाँजा वसाहतीत शिधापत्रिकेवर बोगस शिक्के मारल्याप्रकरणी गांधी चौक पोलिसांनी राष्ट्रवादीचे शहर जिल्हा उपाध्यक्ष हारुण खतीब यांना अटक केली.
तीन वर्षांपूर्वी महापालिका निवडणुकीपूर्वी वसाहतीतील ४५ नागरिकांच्या शिधापत्रिकेवर अन्न सुरक्षा योजनेंतर्गत धान्य मिळण्यासाठी पुरवठा विभागाचे बोगस शिक्के मारून नागरिकांची फसवणूक केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी राष्ट्रवादीचे पदाधिकारी हारुण खतीब यांच्यासह दोघांविरुद्ध महसूल अधिकाऱ्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पुरवठा विभागाचे बोगस शिक्के मारल्याचे उघडकीस आल्यानंतर तत्कालीन तहसीलदार शरद पाटील यांनी चौकशीचे आदेश दिले होते. ४५ नागरिकांना प्रत्येकी शंभर रुपये घेऊन बोगस शिक्के मारून शिधापत्रिका दिल्याचे चाैकशीत निष्पन्न झाल्याने संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला हाेता. या प्रकरणी गांधी चौक पोलिसांनी तीन वर्षांनंतर संदीप पाटील या एका संशयितास अटक केली होती. गुन्हा दाखल असल्याने मंगळवारी हारुण खतीब यांना अटक करण्यात आल्याने राजकीय कार्यकर्त्यांत खळबळ उडाली होती.