सांगली : महापालिकेच्या स्थायी समिती सदस्य निवडीत गुरुवारी काँग्रेसचे माजी मंत्री मदन पाटील यांनी आपले वर्चस्व कायम राखत माजी महापौर इद्रिस नायकवडी गटाला ठेंगा दाखविला. दुसरीकडे आ. पतंगराव कदम समर्थक धोंडुबाई कलकुटगी यांची निवड करून त्यांची नाराजी कमी केली. महापालिकेच्या स्थायी समितीचे आठ सदस्य ३१ आॅगस्ट रोजी निवृत्त होत आहे. यात काँग्रेसचे सहा, तर राष्ट्रवादीच्या दोन सदस्यांचा समावेश आहे. गुरुवारी महासभेत सदस्य निवडीचा विषय अजेंड्यावर होता. काँग्रेसच्या सहा सदस्यांच्या निवडीवरून माजी मंत्री पतंगराव कदम व मदन पाटील गटात वर्चस्वासाठी संघर्ष निर्माण झाला होता. त्यातच मदन पाटील यांनी महापालिकेच्या निवडीत कदम यांनी कधीच हस्तक्षेप केलेला नसून, सदस्यांच्या निवडी आपणच करणार असल्याचे उघड संकेत दिले होते. तर कदम समर्थक माजी महापौर इद्रिस नायकवडी गटाने सदस्यपदासाठी जोरदार मोर्चेबांधणी केली होती. गेले दोन दिवस सदस्य निवडीवरून राजकीय खलबते सुरू होती. मदन पाटील यांनी महापालिकेतच गटनेते किशोर जामदार यांच्याशी बंदखोलीत चर्चा केली होती, तर मंगळवारी पतंगराव कदम यांनी नगरसेवकांची बैठक बोलावून चर्चा करण्याचा डाव आखला होता. पण हा डाव फसल्यानंतर कदम गटाने स्थायी निवडीतून माघार घेतल्याचे संकेत मिळत होते. बुधवारी रात्री पुन्हा कदम यांच्या बंगल्यावर इद्रिस नायकवडी, शेखर माने यांची बैठक झाली. या बैठकीत कदम गटाला तीन जागांची मागणी करण्यात आली. पण ही मागणी मदन पाटील यांनी फेटाळून लावली. त्यांनी दूरध्वनीवरून पतंगराव कदम यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर कदम यांनी महापालिकेच्या राजकारणात लक्ष घालणार नसल्याचे जाहीर केले. गुरुवारी सकाळपासूनच पुन्हा कदम गटाने आक्रमक सूर आळवला. गटनेते जामदार यांच्याकडे कदम गटाचे तीन सदस्य घ्या, नाही तर एकही सदस्य घेऊ नका, असा निरोपही एका नगरसेवकामार्फत धाडण्यात आला. पण जामदार यांनी त्या नगरसेवकाला खडे बोल सुनावले. सदस्य निवडीच्या घोषणेपासूनच मदन पाटील यांनी नायकवडी गटाला संधी न देण्याची भूमिका घेतली. शेवटच्या क्षणापर्यंत ते या भूमिकेवर ठाम होते. त्यात कदम समर्थक धोंडूबाई कलकुटगी यांना संधी देऊन पतंगरावांची नाराजी टाळण्याचा यशस्वी डाव मदनभाऊंनी खेळला. गुरुवारी महासभेत गटनेते किशोर जामदार यांनी महापौरांकडे सदस्यांच्या नावाचा बंद लिफाफा दिला. महापौर विवेक कांबळे यांनी काँग्रेसच्या धोंडूबाई कलकुटगी, बेबीताई मालगावे, संतोष पाटील, अलका हणमंत पवार, निर्मला राजेंद्र जगदाळे, प्रदीप पाटील या सहा सदस्यांची नावे जाहीर केली. यातील कलकुटगी वगळता पाचही नगरसेवक मदनभाऊंचे कट्टर समर्थक आहेत. राष्ट्रवादीने नगरसेवक राजू गवळी व मनगू आबा सरगर यांना संधी दिली. (प्रतिनिधी) जगन्नाथ ठोकळे यांचा राजीनामा स्वाभिमानी आघाडीचे स्थायी समिती सदस्य जगन्नाथ ठोकळे यांनी गुरुवारी सदस्यपदाचा राजीनामा महापौर विवेक कांबळे यांच्याकडे सुपूर्द केला. त्यांच्याजागी अश्विनी खंडागळे यांची निवड केली जाणार आहे. त्यांना एक वर्षाचा कालावधी मिळेल. ठोकळे यांचा राजीनामा स्वीकारला असून पुढील सभेत रिक्त जागेवर नव्या सदस्याची निवड केली जाणार असल्याचे महापौर कांबळे यांनी सांगितले. नायकवडींचा नूर पालटला महापालिकेच्या स्थापनेपासून स्थायी समितीत इद्रिस नायकवडी गटाचा किमान एक तरी सदस्य असायचा. ही परंपरा काँग्रेसच्या सत्ता काळातही कायम होती. प्रथमच नायकवडी गटाला स्थायी समितीतून डावलण्यात आले. यामागे मागासवर्गीय समिती सभापती व उपमहापौर निवडीवेळी नायकवडींनी घेतलेली विरोधाची भूमिका कारणीभूत असल्याची चर्चा आहे. मागासवर्गीय सभापती निवडीत नायकवडी यांनी राष्ट्रवादीच्या उमेदवाराला निवडून आणले होते; तर उपमहापौर निवडीवेळी मदनभाऊ समर्थक प्रशांत पाटील यांच्याविरोधात उमेदवार दिला होता. गेल्या वर्षभरापासून नायकवडी गट नेहमीच कुरघोड्यांच्या पवित्र्यात राहिला आहे. त्याला मदनभाऊंनी झटका दिल्याची चर्चा पालिकेत होती. निष्ठावंतांना ‘अच्छे दिन’ स्थायी समितीत निष्ठावंतांनाच संधी देण्याचे संकेत मदनभाऊंनी दिले होते. त्यासाठी भाऊ समर्थक हाच एकमेव निकष होता. कदम गटातील नायकवडींचा स्थायीतील त्रास कमी करण्यासाठी त्यांना संधी देण्यात आली नाही, तर दुसरीकडे आपल्याच समर्थकांना स्थायी समितीत पाठवून मदन पाटील यांनी पुन्हा एकदा महापालिकेच्या राजकारणातील मांड पक्की केली. आता सभापती पदासाठीही निष्ठावंतावरच जबाबदारी सोपविली जाणार असल्याचे सांगण्यात आले.
पालिका स्थायी समितीत नायकवडी गटाला ठेंगा...
By admin | Updated: August 20, 2015 22:54 IST