ओळी :- महापालिकेने गेल्यावर्षी लावलेली ९० टक्के झाडे सुस्थितीत आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : महापालिका क्षेत्रात २०२० मध्ये वृक्षारोपणांतर्गत लावलेली २३ हजार झाडे जगविण्यात यश आले आहे. यापैकी ९० टक्के वृक्ष सुस्थितीत असून त्याची उंची ६ फुटापर्यंत वाढली आहे. दोन वर्ष देखभालीच्या अटीमुळे या झाडांचे चांगले संगोपन झाल्याचे आयुक्त नितीन कापडणीस यांनी सांगितले.
महापालिका क्षेत्रात २०२० मध्ये २५ हजार वृक्षांचे रोपण करण्यात आले होते. शहरातील खुले भूखंड, मुख्य रस्ते आणि उद्याने याठिकाणी हे वृक्षारोपण झाले होते. हे वृक्ष लावताना ६ फुटापेक्षा अधिक उंची आणि दोन वर्ष देखभाल या अटीवर वृक्षारोपणाचे काम संबंधितांना देण्यात आले होते. त्यामुळे गतवर्षी जून महिन्यात करण्यात आलेल्या २५ हजार झाडांपैकी २३ हजार झाडे सुस्थितीत आहेत. या झाडांची वाढ चांगल्या प्रकारे झाली असून वृक्षारोपणातील ९० टक्के झाडे जगवण्यात महापालिका प्रशासनाला यश आले आहे, असेही आयुक्त कापडणीस यांनी सांगितले.