मिरज : मिरज पूर्वभागात शेतीसह पिण्याचा पाणीप्रश्न गंभीर बनला असल्याने म्हैसाळ योजनेचे आवर्तन तातडीने सुरू करावे अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा मिरज पंचायत समितीचे उपसभापती अनिल आमटवणे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने मंगळवारी दिला तसे निवेदन कार्यकारी अभियंत्यांना देण्यात आले.
मिरज पूर्वभागात विहीर व कुपनलिकांच्या पाणीपातळीने तळ गाठला आहे. टँकरची मागणी वाढत आहे. जनावरांच्या चाऱ्याचाही प्रश्न निर्माण झाला आहे. पाणीटंचाई निवारणासाठी म्हैसाळ योजनेचे आवर्तन सुरू करण्याची गरज आहे. पूर्वभागातील शेतकरी ८१-१९ फाॅर्म्युल्याप्रमाणे पाणीपट्टीचे पैसे भरण्यास तयार आहेत. पाण्यासाठी मागणी अर्ज व पाणीपट्टी वसुलीसाठी विलंब होणार आहे. अधिकाऱ्यांनी तीव्रता लक्षात घेता प्रथम आवर्तन सुरू करून पाणीपट्टी वसुलीची कार्यवाही सुरू करावी. सात दिवसांत पाणी न सोडल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा आमटवणे यांच्या नेतृत्वाखाली खंडेराव जगताप, वसंतराव गायकवाड, तानाजी पाटील, एस. आर. पाटील, प्रदीप सावंत, कृष्णदेव कांबळे, गणेश देसाई, अरविंद पाटील यांच्या शिष्टमंडळाने दिला. कार्यकारी अभियंता सूर्यकांत नलवडे यांना मागणीचे निवेदन देण्यात आले.
चौकट
ग्रामपंचायतींनी ठराव द्यावेत
योजनेच्या लाभक्षेत्रातील गावांचे पाणी मागणीचे ठराव द्यावेत, किमान पंचाहत्तर टक्के ग्रामपंचायतींनी ठराव दिल्यास
योजना सुरू करण्याचे आश्वासन कार्यकारी अभियंता नलवडे यांनी दिले. त्यामुळे ग्रामपंचायतींनी तसे ठराव पंचायत समितीकडे तातडीने देण्याचे आवाहन उपसभापती अनिल आमटवणे यांनी केले आहे.