सांगली : सलग दोन वर्षांपासून कोरोनाच्या संकटात विवाहसोहळे लॉकडाऊन झाल्याने वधू-वरांच्या कुटुंबीयांच्या जिवाची घालमेल सुरू आहे. अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर दागिन्यांसह अन्य खरेदी करून लग्नसराईत मुहूर्तावर लग्न करण्याचा बेत यंदाही अपयशी ठरला आहे. कडक निर्बंध पाळत सोहळे करणे अडचणीचे ठरत असल्याने ते लांबणीवर टाकण्याशिवाय कोणताही पर्याय वधू-वरांच्या कुटुंबीयांकडे राहिला नाही.
मागील वर्षातही शेकडो लग्नसोहळे लॉकडाऊनमुळे लांबणीवर गेले होते. लॉकडाऊन काळात लग्नसराई निघून जाण्याची चिन्हे असल्याने त्यानंतर मुहूर्त शोधून सोहळे करणे अनेकांना कठीण वाटत आहे. सध्या अनेक नियम शासनाने विवाहसोहळ्यांसाठी लागू केल्याने त्यांचे पालन करीत ते पार पाडणे कोणालाही शक्यता होत नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे शेकडो कुटुंबांनी त्यांच्या घरातील विवाह दोन ते तीन महिने लांबणीवर टाकले आहेत.
चौकट
मे महिन्यातील मुहूर्त
मे महिन्यात एकूण १६ मुहूर्त होते. अक्षय्य तृतीयेपर्यंत यातील सात मुहूर्त निघून गेले आहेत. आता १५, २०, २१, २२, २४, २६, २८, ३०, ३१ असे नऊ मुहूर्तच शिल्लक आहेत.
चौकट
नियमांचा अडसर मोठा
विवाहसोहळ्यांसाठी २५ माणसांची मर्यादा असून, या प्रत्येकाची आरटीपीसीआर चाचणी करणे बंधनकारक आहे. वधू किंवा वरांकडील मंडळींसाठी या चाचण्यांचा अडथळा मोठा आहे. २५ माणसांनाच निमंत्रण म्हणजे लग्नसोहळ्यात नाराजीनाट्याची निर्मिती करण्यासारखे वाटत आहे.
चौकट
यंदाही कर्तव्य नाही
कोट
वधू इंदूर येथील असल्याने माझ्या मुलाच्या लग्नसोहळ्याचे नियोजन करताना अडचणी येत आहेत. गेल्या सात महिन्यांपासून मंगलकार्य लांबणीवर टाकत आहे. नियमांचा अडथळा मोठा आहे.
- दत्तात्रय देशपांडे, वरपिता, सांगली
कोट
मुलाच्या लग्नासाठी चारवेळा तारीख पुढे ढकलली. आता लॉकडाऊन काळात नियम पाळत लग्न करणे अशक्य वाटत आहे. आणखी किती दिवस लग्न लांबणीवर जाणार हे माहीत नाही.
- पांडुरंग कोळी, सांगलीवाडी
चौकट
मंगल कार्यालयांचे गणित बिघडले
जिल्ह्यात सध्या सुमारे ३५० मंगल कार्यालये आहेत. दरवर्षी सरासरी प्रत्येक मोठ्या मंगल कार्यालयात ३० ते ४० विवाह होतात. मार्च २०१९ पासून कोरोनामुळे विवाह कार्यांना विघ्न आले. सोहळे बंद असले तरी घरपट्टी, पाणीपट्टी, विद्युत बिल, शासनाचे अन्य कर, बँकेचे हप्ते हे द्यावेच लागतात. त्यामुळे लग्न कार्यालयांना कोट्यवधी रुपयांचा फटका बसला आहे.