मिरज : मिरज शासकीय कोविड रुग्णालय फुल्ल असल्याने ऑक्सिजनचा वापर तिपटीने वाढला आहे. रुग्णालयास दररोज ८ हजार लीटर ऑक्सिजनची गरज असताना कोल्हापूर व पुण्यातून दररोज केवळ ५ हजार लीटर पुरवठा होत असल्याने सिव्हिलची यंत्रणा गॅसवर आहे.
कोविड साथीमुळे मार्चपासून मिरज शासकीय रुग्णालयाचे रूपांतर कोविड सेंटरमध्ये करण्यांत आले. गरीब रुग्णांना मिरज सिव्हिलचा मोठा आधार आहे. कोविड रुग्णसंख्या वाढत असल्याने मिरज शासकीय कोविड रुग्णालयावर मोठा ताण आहे.
मिरज कोविड रुग्णालय सुरु झाल्यानंतर प्रत्येकी ६ हजार किलोलीटर क्षमतेच्या तीन ऑक्सिजन टाक्या येथे बसविण्यात आल्या आहेत. मार्चपर्यंत दररोज तीन हजार लीटर ऑक्सिजनचा येथे वापर सुरू होता. मात्र एप्रिलपासून सुरू झालेल्या कोविडच्या दुसऱ्या लाटेत रुग्ण संख्या झपाट्याने वाढल्याने सध्या दररोज ८ हजार लीटर ऑक्सिजनचा वापर होत आहे. मिरज सिव्हिलची दरारोज १० हजार लीटरची मागणी असतानाही कोल्हापूर व पुण्यातून दररोज ५ व कधी १० हजार लीटर ऑक्सिजन मिळत असल्याने ऑक्सिजनचा तुटवडा आहे. ऑक्सिजनचा समावेश अत्यावश्यक औषधात करण्यात आल्याने ऑक्सिजन पुरवठ्याचे नियंत्रण अन्न व औषध विभागाकडे सोपविण्यात आले आहे. मात्र मागणी जास्त व उत्पादन कमी असल्याने ऑक्सिजनची टंचाई आहे.
चाैकट
सिव्हिलचा श्वास सुरू
बुधवारी ऑक्सिजन टॅंकर आला नसल्याने केवळ ४ तासांचा साठा शिल्लक राहिल्याने सिव्हिल प्रशासनाची धावपळ उडाली. सायंकाळी येणारा टॅंकर पहाटेपर्यंत आला नसल्याने अधिष्ठातासह वैद्यकीय अधिकाऱ्यांना रात्र जागून काढली पहाटे ५ टन ऑक्सिजन घेऊन टॅंकर आल्याने सिव्हिलचा श्वास सुरू झाला.
चाैकट
पोलीस संरक्षण
ऑक्सिजन वाहतूक करणाऱ्या टॅंकरला पोलीस संरक्षण देण्यात येत आहे. मात्र पुण्यातून सांगलीला येणारा ऑक्सिजन येणारा टॅंकर साताऱ्यात अडविण्याच्या घटना घडल्याने ऑक्सिजन मिरजेत पोहोचेपर्यंत सिव्हिलची यंत्रणा गॅसवर आहे.