सांगली : जिल्ह्यातील इस्लामपूर, आष्टा, तासगाव या सर्व नगरपालिकांच्या निवडणुकीसाठी एमआयएम (मजलीस-ए-इत्तेहादुल मुस्लमीन) तयारी करीत आहे. सध्या इस्लामपूर निवडणुकीसाठी लक्ष केंद्रित केले असून भविष्यात जिल्ह्यातील सर्वच निवडणुकांमध्ये आमचा पक्ष उतरेल, अशी माहिती पक्षाचे जिल्हाध्यक्ष शाकीर तांबोळी यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली. ते म्हणाले की, सांगली जिल्ह्यात पक्षाचा विस्तार करण्यात येत आहे. पक्षाची चुकीची प्रतिमा समाजात पसरविली जात आहे. हा पक्ष केवळ मुस्लिम समाजापुरता नाही. यामध्ये दलित व अन्य वंचित घटकांनाही सामावून घेतले आहे. कोणत्याही जाती-धर्मावर आधारित राजकारण आम्ही करीत नाही. पक्षाने गोरगरिबांसाठी रुग्णालयसुद्धा उभारले आहे. शैक्षणिक गोष्टींसाठीही पक्षाने स्वतंत्र काम सुरू केले आहे. सामाजिक पायावर हा पक्ष उभारलेला आहे. सांगलीमध्ये सामाजिक कार्यातूनच पक्षसंघटन मजबूत करण्याचे आमचे ध्येय आहे. त्यामुळे सांगली जिल्ह्यातही त्यादृष्टीने पावले उचलली जात आहेत.येत्या दहा दिवसांमध्ये जिल्ह्याची कार्यकारिणी व अन्य पदांच्या निवडी करण्यात येणार आहेत. मुस्लिम समाजातील जे लोक अन्य प्रस्थापित पक्षांत आहेत, ते अंतर्मनाने आमच्याच पाठीशी आहेत. अन्य पक्षांचे काही लोकही आमच्या संपर्कात आहेत. प्रस्थापित राजकारणी म्हणून काम केलेले लोक जरी एमआयएममध्ये आले तरी, आम्ही नव्या व सुशिक्षित चेहऱ्यांनाच संधी देणार आहोत. नगरपालिका, महापालिका निवडणुकीसाठी तशी तयारी सुरू झालेली आहे. प्रथम इस्लामपूर नगरपालिका निवडणुकीपुरती आमची तयारी आहे. त्यानंतर आष्टा, तासगाव या नगरपालिकांसाठीही आम्ही प्रयत्न करू. राज्यातील नगरपालिका व महापालिका निवडणुकांमध्ये पक्षाला चांगले यश मिळाले आहे. सांगली जिल्ह्यातही असेच यश मिळेल, याची खात्री वाटते, असेही त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)आत्महत्याप्रश्नी आंदोलनजिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या व दुष्काळाच्या प्रश्नावर येत्या काही दिवसात एमआयएमतर्फे आंदोलन छेडण्यात येईल. शेतकरी व शेतीचे प्रश्न गंभीर बनल्यामुळे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी व ते प्रश्न तडीस नेण्यासाठी आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही तांबोळी यांनी यावेळी दिला.
इस्लामपूर पालिकेच्या मैदानात एमआयएम
By admin | Updated: September 1, 2015 22:16 IST