अविनाश बाड - आटपाडी -आटपाडी तालुक्यात पहिल्यांदाच आयोजित केलेल्या मराठी पुस्तकांच्या प्रदर्शनाला माणदेशवासीयांनी अभूतपूर्व प्रतिसाद दिला आहे. अवघ्या आठ दिवसात तब्बल पाच लाखांचा आकडा पार करुन १0 हजारांहून अधिक पुस्तके प्रदर्शनात विकली केली. साने गुरुजींपासून सुमती क्षेत्रमाडेपर्यंत आणि कालिदासांपासून हरिनारायण आपटे यांच्यासह अनेक साहित्यिकांच्या कथा, कादंबऱ्या आणि नाटकांची पुस्तके अबाल-वृध्द खरेदी करत आहेत. वाचन संस्कृती लोप पावत चालली आहे, असा गळा काढणाऱ्या चिंतातुरांना माणदेशी वाचकांनी चोख प्रत्युत्तर दिले आहे.अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषविलेल्या ग. दि. माडगूळकर, व्यंकटेश माडगूळकर, शंकरराव खरात, ना. सं. इनामदार या शब्दप्रभूंची ही भूमी. कारणे काहीही असोत, आजपर्यंत येथे मराठी पुस्तकांचे प्रदर्शनच झालेले नाही. दि. १० डिसेंबरपासून आटपाडी एज्युकेशन सोसायटी येथील दिशा वाचनालय आणि साहित्य परिषदेची आटपाडी शाखा यांच्या विद्यमाने नामवंत लेखकांची पुस्तके फक्त ५० रुपयांत उपलब्ध आहेत. वाचन संस्कृती वृध्दिंगत व्हावी, यासाठी प्रयत्नशील असणाऱ्या अजब प्रकाशन संस्थेच्या पुस्तकांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. सकाळी ९ ते रात्री ९ वाजेपर्यंत सुरु असलेल्या या प्रदर्शनाला दररोज ५00 ते ६00 एवढ्या संख्येने वाचक भेट देत आहेत. या प्रदर्शनात साने गुरुजींची २0 पुस्तके उपलब्ध आहेत. शालेय विद्यार्थ्यांचाही पुस्तके खरेदी करण्याकडे अधिक ओढा आहे.या प्रदर्शनात ना. सी. फडके, नाथ माधव, साने गुरुजी, लोकमान्य टिळक, चंद्रकुमार नलगे, हरी नारायण आपटे, स्वातंत्र्यवीर सावरकर, विनायक ओक, गोपाळ गोडसे, राम गणेश गडकरी, गिरीजा कीर, श्रीकांत मुंदरगी, अनंत तिबिले, नारायण धारप, सुमती क्षेत्रमाडे, माधव शास्त्री, गो. ना. दातार, बा. ग. जोशी आदी लेखकांचे ग्रंथ उपलब्ध आहेत. लोकमान्य टिळकांच्या चरित्राचे तीन खंड आणि ‘गीता रहस्य’चे दोन खंड, हे पाच ग्रंथ केवळ प्रत्येकी पन्नास रुपये याप्रमाणे अडीचशे रुपयांना उपलब्ध आहेत.‘अल्ला हू अकबर, जहर, योगेश्वर श्रीकृष्ण, नल-दमयंती, धन्य ती मुक्ताई’ या धार्मिक ग्रंथासह राजर्षी शाहू महाराज, महाराणी येसुबाई, छत्रपती शिवराय, रामकृष्ण परमहंस, अरविंद, बहिणाबार्इंची गाणी, एकच प्याला’ ते अगदी ‘पथेर पांचाली’ या बंगाली कादंबरी मराठी अनुवाद करुन या ग्रंथ प्रदर्शनात उपलब्ध केली आहे. या प्रदर्शनाला वाचकांकडून मोठा प्रतिसाद मिळत असून, पहिल्याच प्रयत्नात प्रदर्शन यशस्वी ठरले आहे.वाचकांचा उदंड प्रतिसादआटपाडीच्या मध्यवर्ती भागात कल्लेश्वर मंदिर आहे. या मंदिराच्या सभागृहात ग्रंथ प्रदर्शन भरविले आहे. सदैव पाणीटंचाई आणि दुष्काळासाठी प्रसिध्द असलेल्या या गावात प्रथमच आयोजित केलेल्या या प्रदर्शनास रात्री नऊ वाजेपर्यंत वाचकांची गर्दी होत आहे. त्यामध्ये गृहिणींचाही सहभाग उल्लेखनीय आहे. आयोजकांनी ग्रंथप्रदर्शनाच्या शेवटच्यादिवशी ‘आई समजून घेताना’ या विषयावर सहायक शिक्षण संचालक संपत गायकवाड यांचे व्याख्यान आयोजित केले आहे.वाचन संस्कृती वृध्दिंगत व्हावी, यासाठी नुसते बोलत राहण्यापेक्षा जर वाचनाची संधी आपण उपलब्ध करून दिली, तर त्याला लोकांकडून उत्तम प्रतिसाद मिळतो, याचे हे उत्तम उदाहरण आहे. एवढ्या कमी कालावधित १0 हजार पुस्तके येथील मंडळी वाचण्यासाठी विकत घेत आहेत. त्यामध्ये शालेय आणि महाविद्यालयीन तरुणांची संख्या अधिक आहे.- अमरसिंह देशमुख अध्यक्ष, आटपाडी एज्युकेशन सोसायटी
आटपाडीत पुस्तक प्रदर्शनात लाखोंची उलाढाल
By admin | Updated: December 19, 2014 00:22 IST