सांगली : जिल्ह्यातील अनेक शासकीय व खासगी कोविड केअर सेंटरमध्ये वेळेत नाष्टा व जेवण मिळत असले तरी त्याला ना चव आहे, ना दर्जा. रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांनी या जेवणाला कंटाळून घरातून जेवण मागविण्यास सुरुवात केली आहे.
सांगली जिल्ह्यात शहरी तसेच ग्रामीण भागात शासकीय व खासगी कोविड केअर सेंटर सुरू आहेत. एकवेळचा नाष्टा, दोनवेळचा चहा आणि दोनवेळा जेवण अशी सोय करण्यात आली आहे. बऱ्याच ठिकाणी यासाठी ठेकेदार नियुक्त केले आहेत. काही मोजके केअर सेंटर वगळले तर अन्यत्र नाष्टा व जेवणाचा दर्जा चांगला नसल्याच्या तक्रारी समोर आल्या. त्यामुळे रुग्णांच्या नातेवाइकांकडून जेवणाचे डबे केअर सेंटरमध्ये पोहोचविले जात आहेत. त्यामुळे जेवणाचा दर्जा तपासण्याची मागणी होत आहे.
चौकट
जिल्ह्यातील एकूण कोविड केअर सेंटर १४
या सेंटर्समध्ये सध्या दाखल रुग्ण ४११
चौकट
मिरज सिव्हिल, विवेकानंद सेंटरमध्ये मिळते चांगले जेवण
मिरजेच्या शासकीय कोविड रुग्णालयात, विलगीकरण केंद्रात तसेच सांगलीतील स्वामी विवेकानंद केअर सेंटरमध्ये चांगले जेवण मिळत असल्याचा अनुभव काही रुग्णांनी सांगितला. स्वामी विवेकानंद सेंटरमध्ये सध्या ८८ रुग्ण दाखल आहेत. याठिकाणी डॉक्टरांच्या सल्ल्याने पौष्टिक शाकाहारी जेवण रुग्णांना देण्यात येते. त्याबरोबर चहा, नाष्टा व काढाही दिला जातो.
चाैकट
इस्लामपूर कोविड सेंटर्स
इस्लामपुरातील खासगी व शासकीय कोविड केअर सेंटर्समध्ये जेवण वेळेत मिळत असले तरी दर्जाबाबत तक्रारी असल्याने नातेवाईक डबा देतात.
कवठेमहांकाळ केअर सेंटर
कवठेमहांकाळ येथील कोविड सेंटरमध्येही जेवण, नाष्टा, चहा वेळेत दिला जातो; मात्र दर्जाबाबत समाधानी नसल्याने रुग्णांचे नातेवाईक बाहेरूनच डबा देतात.
सांगली, मिरजेतील शहरातील स्थिती
सांगली, मिरज शहरातील मोजके कोविड केअर सेंटर वगळता अन्यत्र जेवणाचा दर्जा राखण्यात आला नसल्याची बाब रुग्णांच्या नातेवाइकांशी केलेल्या चर्चेतून समोर आली.