कोकरुड : कोकरूड (ता. शिराळा) येथील निनाईदेवी यात्रेनिमित्त झालेल्या कुस्ती मैदानात न्यू मोतिबागच्या मारुती जाधवने ‘महाराष्ट्र केसरी’ समाधान घोडके याला घिस्सा डावाने चितपट करत प्रथम क्रमांकाची कुस्ती मारली. या कुस्तीने कुस्ती शौकिनांच्या डोळ्याचे पारणे फेडले. मारुतीला १ लाख रुपये रोख व चांदीची गदा देऊन गौरविले.प्रारंभी मैदानाचे पूजन माजी सभापती नारायण नांगरे, बाळासाहेब पाटील, फत्तेसिंग पाटील, सरपंच सुनील घोडे, सयाजी देशमुख, उदयसिंह देशमुख या मान्यवरांच्याहस्ते करण्यात आले.७५ हजार रुपयांच्या इनामासाठी झालेल्या द्वितीय क्रमांकाच्या लढतीत ‘मोतिबाग’च्या अतुल पाटील याने ‘गंगावेश’च्या विजय गुटाळला चितपट केले, तर ५० हजार रुपये बक्षिसाच्या तिसऱ्या क्रमांकाच्या लढतीत माऊली जमदाडेने विजय धुमाळवर एकलंगी डावाने मात केली. चतुर्थ क्रमांकासाठीच्या लढतीत शाहू कुस्ती केंद्राच्या संग्राम पाटीलवर उमेश शितोडेने विजय मिळविला, तर प्रेक्षणीय कुस्तीमध्ये कोकरुडच्या सागर घोडेने शाहूपुरीच्या प्रवीण खोत याच्यावर विजय मिळविला.मैदानातील इतर विजयी मल्लांमध्ये राजाराम यमगर, अजय निकम, सागर लाड, संदीप माने, संजय पाटील, अमर पाटील, अभिजित भोसले, अमोल यादव, विक्रम चव्हाण, प्रदीप जाधव, तात्या इंगळे, अक्षय जाधव, कुमार पाटील, प्रवीण थोरात, अक्षय पाटील, गणेश घोडे, सौरभ नांगरे, शुभम घोडे, किरण शेडगे, करण करुंगलेकर, प्रकाश जाधव, मारुती सावंत, विशाल जाधव, दत्ता बनकर, शुभम चव्हाण, नितीन ढेरे, सागर पाटील यांचा समावेश आहे.उपमहाराष्ट्र केसरी संपतराव जाधव, आनंदा धुमाळ, शिवाजी लाड, पांडुरंग पाटील, संजय माने, भास्कर नायकवडी यांनी पंच म्हणून काम पाहिले. सुरेश जाधव चिंचोलीकर यांनी समालोचन केले. मैदानात माजी आमदार मानसिंगराव नाईक, युवा नेते सत्यजित देशमुख, माजी सभापती हणमंतराव पाटील, संपतराव देशमुख, शिवाजीराव घोडे, गजानन पाटील, उपसरपंच सयाजी देशमुख, सुरेश कोकणे, सर्जेराव पाटील, अशोक चिंचवडेकर, विकास नांगरे, सुहास घोडे, पोपट पाटील, विकास पाटील, मोहन पाटील, अंकुश नांगरे, श्रीरंग नांगरे उपस्थित होते. (वार्ताहर)
कोकरूड मैदानात मारुती जाधव विजयी
By admin | Updated: December 17, 2014 22:57 IST