अंजर अथणीकर - सांगली --स्वच्छतागृहे, पार्किंग व्यवस्था, शेतकऱ्यांसाठी निवास व्यवस्था आदी पायाभूत सुविधांबरोबरच मार्केट यार्डमधील सुरक्षा व्यवस्थेचाही प्रश्न गंभीर बनला आहे. समस्यांच्या विळख्यात सापडलेल्या मार्केट यार्डातील व्यापारी आता पायाभूत सुविधांसाठी संघर्ष करीत आहेत. जवळपास ९० टक्के सेस देणारी सांगली बाजार समिती असताना, निधी मात्र जत, कवठेमहांकाळला खर्च होत असल्याचा आरोप करुन, बाजार समितीचे त्रिभाजन करावे, अशी मागणी व्यापारी करीत आहेत. हळद, गूळ, सोयाबीन व अन्नधान्यासाठी सांगलीची बाजारपेठ ही दक्षिण महाराष्ट्रातील महत्त्वाची बाजारपेठ समजली जाते. विशेषत: कर्नाटकातून येणाऱ्या शेतीमालावर सांगलीची बाजारपेठ अवलंबून आहे. येथील मार्केट यार्डमध्ये जवळपास पाचशे ते सहाशे ट्रकमधून शेतीमालाची रोजची आवक होत असते. याठिकाणी सुमारे पाचशे ते साडेपाचशे घाऊक व्यापारी आहेत. त्याचबरोबर दीड हजार हमाल, कामगारांना रोजचा रोजगार याठिकाणी मिळतो. येथील कृषी उत्पन्न बाजार समितीला वार्षिक ८ कोटी ५० लाखांचा सेस विविध रूपांनी मिळतो. यामधील ९० टक्क्याहून अधिक सेस हा सांगली बाजार समिती, विष्णुअण्णा फळ मार्केट व मिरज बाजार समितीमधून मिळतो. जत, कवठेमहांकाळमधून मिळणारा सेस हा दहा टक्क्याहूनही कमी आहे. जवळपास सात कोटी सेस देणाऱ्या सांगली मार्केट यार्डात मोठ्याप्रमाणात समस्या निर्माण झाल्या आहेत.गेल्या आठवड्यात या परिसरामध्ये ९ दुकाने फोडण्यात आली. भुरट्या चोऱ्यांचे प्रमाण तर खूपच वाढले आहे. बाहेरगावाहून येणाऱ्या शेतकऱ्यांसाठी निवासाची याठिकाणी कोणतीच सोय नाही. संपूर्ण मार्केट यार्डमध्ये स्वच्छतागृह नाही. पार्किंग व्यवस्थाही सुरळीत करण्यात आलेली नाही. रस्त्यांचीही दुरवस्था झाली आहे. वेळोवेळी मागणी करुनही रस्त्यांची दुरवस्था तशीच राहिल्याने आता बाजार समितीनेच स्वखर्चाने मुख्य रस्ता हॉटमिक्स करण्यास सुरुवात केली आहे. अंतर्गत रस्ते मात्र अद्याप खराबच आहेत. सांगलीतून गोळा होणारा सेस जत, कवठेमहांकाळमध्ये खर्च होत आहे. बाजार समितीवर यापूर्वी जत, कवठेमहांकाळमधील राजकीय लोकांचे वर्चस्व राहिल्याने तेथेच हा निधी जात आहे. त्यामुळे सांगलीतील व्यापाऱ्यांकडून कृषी उत्पन्न बाजार समितीचे सांगली, जत आणि कवठेमहांकाळ असे त्रिभाजन करण्यात यावे, अशी मागणी होत आहे.बाजार समितीकडे गोळा होणारा ९० टक्के सेस हा मिरज तालुक्यातून होत आहे. मार्केट यार्डमध्ये रस्ते, स्वच्छतागृहे, शेतकऱ्यांसाठी निवास व्यवस्था नाही. सुरक्षा व्यवस्थाही नाही. आमचा निधी आमच्याच ठिकाणी खर्च झाला पाहिजे, अशी आमची मागणी आहे. जत आणि कवठेमहांकाळ समित्या आता सक्षम झाल्या आहेत. त्यामुळे त्या आता सांगलीपासून वेगळ्या करण्यात याव्यात, याबाबत आम्ही लवकरच सहकारमंत्र्यांचीही भेट घेणार आहोत. - मनोहर सारडा, अध्यक्ष, चेंबर आॅफ कॉमर्सबाजार समितीच्या निधीतून मुख्य रस्ता हॉटमिक्स करणे, सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे, जत आणि कवठेमहांकाळमध्ये हजार मेट्रिक टन क्षमतेचे गोदाम बांधण्याचे काम सुरु करण्यात आले आहे. त्यामुळे आगामी काही दिवसात सर्व समस्या दूर होतील. विष्णुअण्णा फळ मार्केटमध्येही अंतर्गत रस्त्यांचे काम सुरु आहे. महापालिकेने रस्ते बांधकामाकडे दुर्लक्ष केल्याने समितीच्या निधीतून रस्ते करण्याचे काम सुरु करण्यात आले आहे. त्यामुळे निश्चितपणे याठिकाणचे चित्र बदलेल. - मनोहर माळी, प्रशासक, सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती
मार्केट यार्ड समस्याग्रस्त
By admin | Updated: November 19, 2014 23:22 IST