सांगली : जिल्ह्यातील कोरोना संसर्ग रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमध्ये पुन्हा सात दिवसांची वाढ करण्यात आली आहे. कोरोनाबाधितांच्या संख्येतील वाढ कायम असल्याने हा निर्णय घेण्यात आला. मात्र किराणा, फळे व भाजीपाला विक्रेत्यांना दुकाने बंद ठेवून घरपोहोच सेवा देता येणार आहे. उद्या, बुधवारपासून २६ मेपर्यंत हे निर्बंध कायम राहणार आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.
जिल्ह्यात लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनला तीन दिवसांची मुदतवाढ दिली होती. मंगळवारी सकाळी त्याची मुदत संपणार होती. मात्र, पालकमंत्री जयंत पाटील यांनी सोमवारी ऑनलाईन पद्धतीने जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींशी चर्चा करून लॉकडाऊन वाढविण्याचा निर्णय घेतला. जिल्हाधिकारी डॉ. चौधरी यांनी त्याबाबत माहिती दिली.
जिल्हाधिकारी डॉ. चौधरी म्हणाले की, कोरोनाची साखळी तोडण्यासाठी ७ मेपासून जिल्ह्यात कडक लॉकडाऊन लागू करण्यात आला होता. शनिवारी त्यास तीन दिवसांची मुदतवाढ देण्यात आली होती. हेच निर्बंध आता वाढविण्यात आले आहेत. १९ मेपासून २६ मेपर्यंत नवीन नियमांनुसार लॉकडाऊनची अंमलबजावणी होईल.
जिल्ह्यातील सर्व किराणा, भाजीपाला व फळ विक्रेत्यांना आता घरपोहोच सेवा देण्यास मुभा देण्यात आली आहे. मात्र, त्यांनी आपली दुकान उघडे ठेवून ही सेवा देऊ नये. दुकानांतून पार्सल सुविधा देण्यासही परवानगी असणार नाही. किरकोळ विक्रेत्यांना माल देण्यासाठी मार्केट यार्डातील केवळ घाऊक विक्रेत्यांना सकाळी ७ ते ११ वेळेत परवानगी देण्यात आली आहे. इतर कोणतेही व्यवसाय या कालावधीत उघडे ठेवता येणार नाहीत. मालवाहतूक व अत्यावश्यक सेवेतील वाहनांच्या दुरुस्तीसाठी गॅरेज सुरू ठेवण्यात येणार आहेत. यासाठी सुट्या भागांचा पुरवठा करणाऱ्यांना थेट गॅरेजमध्ये पुरवठा करण्यास परवानगी देण्यात आली आहे. या काळात हॉटेल्स, बार, रस्त्यावरील खाद्यपदार्थ विक्री, भाजी मंडई, मटण, चिकन, अंड्याची दुकाने बंदच राहणार आहेत, असे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
चौकट
नवीन नियमानुसार हे चालू राहणार
किराणा, फळे व भाजीपाला विक्रेत्यांची घरपोहोच सेवा
मालवाहतूक व अत्यावश्यक सेवेतील वाहनांच्या दुरुस्तीसाठी गॅरेज
मार्केट यार्डातील केवळ होलसेल किराणा दुकाने ७ ते ११ वेळेत सुरू
कृषी औषधे दुकाने सकाळी ७ ते ११ या वेळेत सुरू
दूधविक्रीची दुकाने व घरपोहोच दूध विक्री
चाैकट
कृषी सेवा केंद्रांना परवानगी
सध्या शेतीतील कामे सुरू झाल्याने कृषी सेवा केंद्रांना सकाळी ७ ते ११ वेळेत परवानगी देण्यात आली आहे. यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळणार असून, खरीप हंगामाची कामेही करता येणार आहेत.