दुष्काळ, अतिवृष्टी, महापूर, अशा प्रत्येक संकटात लोकांच्या मदतीला धावणारे विद्यमान सहकार व कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांनी कोरोनाविरुद्धच्या लढाईतही फ्रंटफूटवर राहून अविरतपणे काम केले आहे.
एखाद्या राजकीय नेत्याने संकटकाळात जनतेला कसा धीर द्यावा याचे आदर्श उदाहरण डॉ. विश्वजीत कदम यांनी घालून दिले आहे.
डॉ. विश्वजीत कदम यांनी प्रशासनातील सर्व अधिकारी-कर्मचारी, ग्राम दक्षता समिती यांच्याबरोबर कोरोनाविरुद्धच्या लढाईत प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून लोकांना धीर दिला आहे. डॉक्टर, नर्सेस, पॅरामेडिकल स्टाफ, सफाई कामगार, अंगणावाडी ताई, आशा ताई, पोलीस बांधव, स्थानिक स्वराज संस्थांचे अधिकारी-कर्मचारी, स्वयंसेवी संस्थांचे कार्यकर्ते, असे अनेक जण जोखीम पत्करून कर्तव्य पार पाडत
असताना त्यांच्या कामाचे कौतुक केले आहे. गावोगावचे नागरिकही कोरोनाविरुद्धच्या लढाईत सक्रिय योगदान देत असताना त्यांच्याशी संवाद साधला.
कोणतीही लढाई असो ती साधनसामग्री, फौजफाटा, शस्त्रास्त्रे यांच्या बळावरच जिंकता येते, असे नाही, तर त्यासाठी लागते नियोजन आणि कुठल्याही प्रसंगी हार न मानण्याची आणि लढण्याची हिंमत असावी लागते. हीच हिंमत घेऊन कोरोनाविरुद्धच्या लढाईत सहकार व कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम यांनी आपल्या पलूस कडेगाव मतदारसंघाच्या सुरक्षितेकडे लक्ष देऊन कोरोना हद्दपार करण्यासाठी आपले सर्वतोपरी प्रयत्न केले आहेत. अजूनही कोरोनाचे संकट पूर्णतः दूर झाले नसले तरी कोरोनाचे थैमान रोखण्यात प्रशासनाला यश आले आहे. यात डॉ. विश्वजीत कदम यांचेही योगदान आहे. संकटकाळी लोकांना सर्वतोपरी मदत करण्यासाठी कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम पुढे आले आणि त्यांनी पुणे व सांगली येथील भारती हॉस्पिटलमध्ये कोरोनाबाधित रुग्णांवर उपचाराच्या सुविधा दिल्या. कडेगाव येथेही भारती हॉस्पिटलच्या माध्यमातून कोविड केअर सेंटर सुरू केले. कोरोनाविरुद्धच्या लढाईत विश्वजीत कदम यांनी आपले कसब पणाला लावून एकाचवेळी विविध आघाड्यांवर योगदान दिले आहे, तसेच लॉकडाऊनसारख्या अतिशय बिकट परिस्थितीमध्ये अनेकांना जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा भासत होता. यावेळी डॉ. विश्वजीत कदम यांनी पलूस-कडेगाव तालुक्यातील गोरगरीब लोकांसाठी जीवनावश्यक साहित्याचे कीट वाटप केले. कोरोना कालावधीत त्यांनी राज्यभर दौरे करून जनतेला धीर दिला. स्वतःचा जीव धोक्यात घालून जनसेवा केली. यात सप्टेंबर महिन्यात डॉ. विश्वजीत कदम यांना कोरोनाची बाधा झाली. जनतेच्या सेवेसाठी तत्पर असणारे कदम कटुंबातील ज्येष्ठ सदस्य आमदार मोहनराव कदम दादा यांच्यासह ९ जणांचा कोरोना अहवाल त्यावेळी पॉझिटिव्ह आला होता. ते सर्व जण ठणठणीत बरे झाले आहेत. ही त्यांच्या समाजसेवेची पुण्याई आहे. याशिवाय सन २०१९ मध्ये कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांना महापुराचा तडाखा बसला, त्यावेळीही डॉ. विश्वजीत कदम
यांनी नदीकाठच्या भागात तळ ठोकून संकटात सापडलेल्या पूरग्रस्तांना सर्वतोपरी मदत केली होती.
स्वतः जीव धोक्यात घालून पुरात अडकलेल्या लोकांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी पुराने वेढलेल्या गावांमध्ये बोटीत बसून प्रवेश केला.
यावेळी १७ माणसांची क्षमता असलेल्या बोटीत बसून बाहेर येणासाठी धडपड करणाऱ्या माणसांची गर्दी त्यांनी पहिली. बोटचालक फक्त १७ लोकांनीच बसा, अशी विनंती करत होता. पुराचे पाणी वाढत होते. त्यामुळे लोक ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हते. यावेळी जास्त लोकांनी बसून जीव धोक्यामध्ये टाकू नका. आपण सगळ्यांनी बोटचालकाचे ऐकले पाहिजे. १७ माणसांची बोट आहे, तर १७ माणसेच बसली पाहिजेत. बाकीच्यांनी उतरा. माझी विनंती आहे. माझा शब्द आहे तुम्हाला, मी इथेच थांबणार आहे, इथली माणसे सुखरूप बाहेर गेल्याशिवाय मी विश्वजीत कदम
इथून जाणार नाही, असे विश्वजीत कदम यांनी सांगितले. पूरग्रस्त नागरिकांसाठी त्यांनी ठिकठिकाणी मदत केंद्रे उभारून त्यांच्या निवास व भोजनाची सोय केली. पूरग्रस्तांच्या मदतीसाठी २५ लाख रुपयांचा निधी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्द केला. यावेळी डॉ. विश्वजीत कदम यांच्या कामगिरीचे तमाम महाराष्ट्राने कौतुक केले. लोकांना वाचवण्यासाठी बोटी कमी पडत होत्या. चार- चार दिवसांपासून लोक घरांच्या छतावर बसून होते. अशा परिस्थितीत पूरग्रस्तांना विश्वजीत कदम
यांनी सर्वतोपरी मदत केली. त्यावेळी सातत्याने मदतकार्यात धावपळ करणाऱ्या विश्वजीत कदम यांच्या पायाला जखमा झाल्या आहेत; पण ते पूरग्रस्तांच्या सेवेसाठी तळ ठोकून राहिले.
आघाडी शासनाच्या काळात राज्यावर अनेक संकटे आली, त्या काळात पतंगराव कदम मदत व पुनर्वसनमंत्री होते. त्यावेळी माणूसच काय; पण जनावरांच्या सुरक्षिततेचीही दक्षता घेतली होती, साहेबांची उणीव येथील जनतेला भासू दिली नाही.
२००२ च्या दुष्काळात विश्वजीत कदम यांनी स्वतःचा वाढदिवस साजरा न करता चारा छावण्यांना
चारा पुरविला. यावेळी दस्तुरखुद्द सोनिया
गांधी यांनी त्यांच्या कामगिरीचे कौतुक
केले होते. यानंतर २००५ च्या महापुरातही विश्वजीत कदम पूरग्रस्तांच्या मदतीला धावले होते.
दुष्काळ असो, महापूर असो किंवा अतिवृष्टी असो, कोणत्याही संकटाचा मुकाबला करण्यासाठी डॉ. विश्वजीत कदम सज्ज असतात. इतकेच काय पण मतदारसंघातील आजारी रुग्णांवर वेळेत उपचार व्हावेत, पैशांअभावी गोरगरीब रुग्ण उपचारांपासून वंचित राहू नयेत, याची ते कटाक्षाने दक्षता घेताना दिसतात. गोरगरीब विद्यार्थी उच्चशिक्षणापासून वंचित राहू नयेत. यासाठी फी सवलती देतात.
जनतेच्या सुखदुःखात स्वतः सहभागी होऊन आपल्या मतदारसंघाला विकासाकडे नेण्याची, मंत्री म्हणून राज्याच्या विकासाचे निर्णय घेण्याची विधायक दृष्टी विश्वजीत कदम यांच्या
कृतीतून दिसते.
विश्वजीत कदम यांचे नेतृत्व भक्कम आहे. वैचारिक बैठकही पक्की आहे. आव्हानांना सामोरे जाण्याची त्यांची लढाऊ वृत्ती दिसून येते, महाराष्ट्र कोरोना संकटाचा सामना करत असताना त्यांची ही लढाऊ वृत्ती निश्चितच पलूस-कडेगाव मतदारसंघासह राज्याला उपयुक्त ठरली आहे.
-लेखक : अजीत मुळीक
-शब्दांकन : प्रताप महाडिक