अशोक डोंबाळे - सांगली .. ढगांची दाटी आणि संततधार बरसणाऱ्या पावसाने जिल्ह्याला दिलासा मिळाला असला तरी, जिल्ह्यातील तलावांतील पाणी साठ्याची स्थिती अजूनही समाधानकारक नाही. काही ठिकाणचा पाणीसाठा समाधानकारक, तर काही ठिकाणचा चिंताजनक दिसत आहे. जिल्ह्यात पावसाची सरासरी चांगली असली तरी, एकूण तलावांमधील पाणी साठ्याची सरासरी तितकी समाधानकारक नाही. संपूर्ण जिल्ह्यात सध्या ३0 टक्केच तलाव पूर्ण क्षमतेने भरले आहेत. त्यामुळे वर्षभराचा विचार केला, तर आणखी पावसाची गरज आहे. जिल्ह्यातील ८३ पाझर तलावांमध्ये ९ हजार ३९८.७५ दशलक्ष घनफूट पाणी साठवून ठेवण्याची क्षमता आहे. गेल्या दीड महिन्यात जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे दोन हजार ८५३.५४ दशलक्ष घनफूट पाणीसाठा झाला असून, मिरज, कडेगाव तालुक्यातील तलावांमध्ये ६० टक्के पाणीसाठा झाला आहे. शिराळा तालुक्यातील पाचही तलाव शंभर टक्के भरल्यामुळे तेथील गावांवरील पाणीटंचाईचे संकट टळले आहे. जत, आटपाडी, तासगाव तालुक्यातील तलावांमध्ये आजही २० टक्केपेक्षा कमी पाणीसाठा असल्यामुळे जोराचा पाऊस झाला नाही, तर भविष्यात पाणीटंचाईचे संकट निर्माण होण्याची चिन्हे आहेत. मान्सून गायब झाला असे म्हणताच जिल्ह्यात जुलैच्या पहिल्या आठवड्यात मान्सूनने हजेरी लावली. जिल्ह्यातील अनेक भागांत दमदार पाऊस झाला. थांबलेल्या खरीप पेरण्यांनीही पुन्हा गती घेऊन ७० टक्क्यांपर्यंत कशीबशी आकडेवारी पोहोचली. मान्सूनची आकडेवारी आणि जिल्ह्यातील तलावातील पाणीसाठा पाहिल्यास दुष्काळी भागात पुरेसा पाऊस झाला नसल्याचे दिसत आहे. जिल्ह्यात लहान आणि मोठे ८३ पाझर तलाव असून, त्यापैकी सर्वाधिक २८ जत तालुक्यात आहेत. जत तालुक्यातील तलावांची पाणी साठ्याची क्षमता ३ हजार ७१४.०५ दशलक्ष घनफूट आहे. सध्या या तलावांमध्ये ३९९.४८ दशलक्ष घनफूट पाणीसाठा झाला आहे. तलावातील पाणीसाठा केवळ ११ टक्के असून, तो दोन महिने पुरेल एवढाच आहे. सध्या कृष्णा नदीतून पाणी वाहून जात आहे. म्हैसाळ योजनेच्या माध्यमातून जत, कवठेमहांकाळ, मिरज तालुक्यातील तलाव भरण्याची गरज आहे. अन्यथा डिसेंबर, जानेवारीत दुष्काळी तालुक्यात भीषण पाणीटंचाई जाणवण्याची शक्यता आहे.शिराळा तालुक्यातील वाकुर्डे, अंत्री, टाकवे, शिवणी हे सर्व तलाव शंभर टक्के भरले आहेत. वाळवा तालुक्यातील कार्वे, रेठरेधरण तलाव ५६ टक्के भरले आहेत.
जिल्ह्यातील तलाव ३० टक्केच भरलेले...
By admin | Updated: August 7, 2014 00:20 IST