बाबासाहेब परीट - बिळाशी कोकरूड (ता. शिराळा) येथील ग्रामीण रुग्णालय सोयी-सुविधांविना व डॉक्टर नसल्याने शेवटचे आचके देत आहे. कोट्यवधी रुपये खर्च होऊनही नागरिकांना खासगी रुग्णालयात धाव घ्यावी लागत आहे. आरोग्य यंत्रणेच्या हलगर्जीपणामुळे सामान्य माणसांमध्ये तीव्र असंतोष आहे. गेले काही दिवस पूर्ण वेळ डॉक्टर उपलब्ध नसल्याने कोकरूडचे ग्रामीण रुग्णालय आॅक्सिजनवर, तर रुग्ण मृत्युशय्येवर आहेत.कोकरूड येथे ग्रामीण रुग्णालयास मान्यता मिळूनही प्राथमिक आरोग्य केंद्र बिळाशी येथे हलविण्यात येणार होते. परंतु सध्या कोकरूड येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या जागेवरच ग्रामीण रुग्णालय सुरू आहे. परंतु गेले अनेक दिवस डॉक्टरविना रुग्णांची हेळसांड सुरू आहे. गेल्या महिन्याभरात बिळाशी येथील महादेव हंडे, बबनराव धस, वैशाली साळुंखे, मानसिंग साळुंखे या व्यक्तींना सर्पदंश झाला. कोकरूड आरोग्य केंद्रात व रुग्णालयात सर्पदंश लस उपलब्ध नसल्याने त्यांना कोल्हापूर, सांगलीला हलवावे लागले. सध्या येथील नागरिकांना १०८ रुग्णवाहिकेचा आधार वाटत आहे.सुरुवातीपासूनच येथील डॉक्टरांचा पदभार शिराळा किंवा सागावकडे दिला आहे. त्यामुळे २४ तास आवश्यक सेवेचा बोजवारा उडाला आहे. याबाबत मागील काही दिवसांपासून पूर्वी तरुणांनी डॉक्टर उपलब्ध हेण्यासाठी आंदोलन केले होते. परंतु सध्या एनआरएचएम डॉक्टरांवरच हे आरोग्य केंद्र चालू आहे. ज्यांच्याकडे चार्ज आहे, ते डॉक्टर इकडे फिरकत नसल्याचीही चर्चा नागरिकांतून सुरू आहे.ग्रामीण रुग्णालयासाठी पाच डॉक्टर पदे मंजूर असून, त्यामध्ये एक एम. डी. किंवा एम. एस. दर्जाचा, एक स्त्रीरोगतज्ज्ञ, बालरोगतज्ज्ञ, भूलतज्ज्ञ, अस्थिरोगतज्ज्ञ व एनआरएचएमचे आयुर्वेद व होमिओपॅथिक असे सात डॉक्टर्स, आठ नर्स, दोन परिचर, पाच शिपाई, तीन क्लार्क, दोन वाहनचालक असा मंजूर कर्मचारी वर्ग आहे. परंतु येथे एनआरएचएमच्या डॉक्टरांशिवाय अन्य डॉक्टर उपलब्ध नसतात. तातडीसाठी १०८ रुग्णवाहिकेचे डॉक्टर्स उपलब्ध असतात. भोंगळ कारभाराने नागरिक हैराण झाले आहेत. प्रशासन हलविण्यासाठी लोकप्रतिनिधींनी ठोस भूमिका घेऊन लोकांना आरोग्य सुविधा उपलब्ध करून देणे गरजेचे असल्याची भावना नागरिकांतून व्यक्त होत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून रात्रीच्यावेळी पूर्ण वेळ डॉक्टर उपलब्ध होण्यासाठी नागरिकांची मागणी आहे. याबाबत प्रशासनाने ठोस पावले उचलणे गरजेचे आहे.खर्च मोठा : पण रुग्णांच्या गैरसोयीचे काय?सध्या ‘आॅक्टोबर हिट’ असल्याने या दिवसात सर्पदंश होण्याचे प्रमाण अधिक असते. शिराळा तालुक्यातील लोक शेतीवरच उपजीविका करीत असल्याने सर्पदंशाच्या घटना वारंवार घडतात. परंतु कोकरूड, चरण, मणदूर इथे सर्पदंश व श्वानदंशाच्या लसी उपलब्ध नाहीत. त्यामुळे इथल्या नागरिकांचे आरोग्य रामभरोसे आहे. याकडे गांभीर्याने लक्ष देऊन पूर्णवेळ डॉक्टर व सर्पदंशाची लस उपलब्ध करण्याची मागणी होत आहे. आरोग्य केंद्र व ग्रामीण रुग्णालयात एकही गंभीर शस्त्रक्रिया झालेली नाही व महिलांना प्रसुतीसाठीही इतरत्र पाठवले जाते. केवळ कोट्यवधी रुपये खर्ची पडतात; पण नागरिकांना त्याचा फायदा होत नसेल तर हा खर्च व्यर्थ आहे. कोकरूड येथील ग्रामीण रुग्णालयाच्या भोंगळ कारभाराचा प्रत्यय मंगळवारी पुन्हा आला. धनगरपाडा येथून आलेल्या ८५ वर्षाच्या वृध्देला रूग्णालयात डॉक्टर नसल्याने उपचारांशिवाय परत जावे लागले.
कोकरूड ग्रामीण रुग्णालय ‘कोमात’
By admin | Updated: October 22, 2015 00:52 IST