आटपाडी तालुक्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढू लागल्याने कडक उपाययोजना करण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन समितीची बैठक तहसीलदार सचिन मुळीक, पोलीस निरीक्षक भानुदास निंभोरे, प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ. उमाकांत कदम व सरपंच वृषाली पाटील यांच्या उपस्थितीत ग्रामपंचायत कार्यालयात झाली. यावेळी प्रतिबंधक उपायांची कडक अंमलबजावणी करण्याचे आदेश तहसीलदार सचिन मुळीक यांनी दिले.
काही नागरिक विनाकारण सार्वजनिक ठिकाणी फिरत असल्यास अगर कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन करत असल्यास संबंधित व्यक्तीवर गुन्हे दाखल करणार असल्याचे पोलीस निरीक्षक भानुदास निंभोरे यांनी सांगितले.
कोरोनाचा कहर कमी करण्यासाठी, आजपासून जे नागरिक कोरोना पाॅझिटिव्ह येतील त्यांना घरी विलगीकरणात न ठेवता, संसर्गाची तीव्रता पाहून त्यांच्या निवासस्थानापासून जवळ असलेल्या शाळा, महाविद्यालयात किंवा आयटीआय काॅलेजजवळ असलेल्या शासकीय वसतिगृहामध्ये ठेवण्याचा महत्त्वाचा निर्णय झाला.
आटपाडी ग्रामपंचायतअंतर्गत एकूण सहा वाॅर्ड आहेत. त्यामुळे वाॅर्डनिहाय समित्या स्थापन करण्यात आल्या.
यावेळी ॲड. धनंजय पाटील, उपसरपंच प्रा. अंकुश कोळेकर, ग्रामपंचायत सदस्य बाळासाहेब मेटकरी, प्रकाश मरगळे, विजय पाटील, चंद्रकांत हाके, प्रदीप लांडगे, रावसाहेब सागर, राजेंद्र बालटे, उमाकांत देशमुख, सर्जेराव राक्षे, मधुकर माळी, तलाठी सुधाकर केंगार, ग्रामसेवक दत्तात्रेय गोसावी उपस्थित होते.