करगणी : आटपाडी तालुक्यातील बनपुरी गावचे सरपंच व ग्रामसेवक यांनी संगनमत करून नियमबाह्य कामे करत कोट्यवधी रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार केला आहे. याची दखल घेऊन ग्रामपंचायतीच्या जमा-खर्चाची चौकशी करावी, अशी मागणी संजय यमगर यांनी केली आहे. याबाबत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी यांना निवेदन दिले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, बनपुरीतील ग्रामपंचायतचे सरपंच व ग्रामसेवक यांनी नियमबाह्य कामे, बोगस बिले, आथिर्क देवाण-घेवाण करत चुकीच्या परवानगी देणे व नोंदी केल्या आहेत.
दलित वस्ती सुधार योजनेच्या लाखो रुपयांच्या निधीचा गैरवापर केला आहे. सरपंच व सदस्य यांनी संगनमत करून बनपुरीतीलच गायरान जागेवर अतिक्रमण करत दुकानगाळे बांधले आहेत, असा आरोप करत बनपुरी ग्रामपंचायतीच्या सन २०१८-१९ व २०१९-२० व आजअखेर जमाखर्चाची चौकशी करण्याची मागणी निवेदनात केली आहे.
कोट
बनपुरीतील लोकनियुक्त सरपंच व ग्रामसेवक यांनी कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार केला असून माहिती अधिकारातून हे समोर आले आहे. जनतेच्या पैशाचा गैरव्यवहार करणाऱ्या सरपंच व ग्रामसेवक यांची चौकशी करून कारवाई करावी.
- संजय यमगर, बनपुरी.