लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : महापालिका क्षेत्रात कोरोनाचा संसर्ग वाढला आहे. काही रुग्णांकडून घरीच परस्पर उपचार घेतले जात आहेत. प्रशासनाकडेही अशा रुग्णांची नोंद नाही. त्यामुळे कोरोनाचा प्रसार आणखी वाढण्याची शक्यता असल्याने आयुक्त नितीन कापडणीस यांनी छुप्या कोरोना रुग्णांचा शोध घेण्यासाठी विशेष मोहीम हाती घेतली आहे. त्याअंतर्गत आयुक्तांनी शहरातील औषध दुकानांची तपासणी सुरू केली आहे.
डॉक्टरांच्या चिठ्ठीवरून कोरोनासदृश केल्या जाणाऱ्या औषध विक्रीची माहिती घेत यापुढे कोरोनासदृश आजाराची औषधे घेणाऱ्या व्यक्तीची माहिती महापालिकेला द्यावी, अन्यथा औषध विक्रेत्यांवर गुन्हे दाखल करण्याचा इशाराही त्यांनी दिला.
महानगरपालिका क्षेत्रात कोरोना रुग्णांची संख्या वाढली आहे. अनेक जणांना कोरोनासदृश लक्षणे असतानाही तपासणी न करता परस्पर डॉक्टरांकडून तात्पुरत्या स्वरूपात औषध घेऊन उपचार करत असल्याचे निदर्शनास आले. या व्यक्ती पाॅझिटिव्ह असतील तर त्या कोरोनाचा संसर्ग वाढण्यास कारणीभूत ठरू शकतात. त्यामुळे अशा व्यक्तींना शोधण्याची मोहीम महापालिकेकडून सुरू झाली आहे.
याचाच भाग म्हणून सांगली शहरातील अनेक औषध विक्रीच्या दुकानांची आयुक्त नितीन कापडणीस अचानक पाहणी करीत त्यांच्याकडून कोरोनासदृश विक्री होणाऱ्या औषधांची माहिती घेतली. यामध्ये अनेक व्यक्ती या डॉक्टरांच्या चिठ्ठीवरून कोरोनासदृश औषध घेऊन कोणतीही तपासणी न करता घरीच थांबत असल्याचे निदर्शनास आले आहे. कोरोनासदृश आजाराची औषधे घेण्यासाठी आलेल्या व्यक्तींची माहिती महापालिका प्रशासनाला कळविण्याबाबत आयुक्तांनी दुकानदारांना सूचित केले. जे कोणी औषध विक्रेते अशा व्यक्तींची माहिती कळविणार नाहीत, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा त्यांनी दिला. यावेळी आरोग्याधिकारी डॉ. सुनील आंबोळे उपस्थित होते.