आष्टा : आष्टा शहरातील पेठ-सांगली रस्त्यावरील रस्त्याच्या दोन्ही बाजूंच्या अतिक्रमणाबाबत हमीपत्र देण्याची ३ फेब्रुवारी ही अंतिम मुदत संपल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने अतिक्रमण काढण्याची जय्यत तयारी केली. मात्र पोलीस फौजफाटा अद्यापही न मिळाल्याने ही मोहीम तात्पुरती थंडावली आहे. मात्र अतिक्रमण निघणार, हे निश्चित झाल्यानंतर सुमारे ३९ खोकीधारकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे हमीपत्र सादर केले. उर्वरित खोकीधारकही हमीपत्र देण्यासाठी धावाधाव करीत असून, काही व्यावसायिकांनी स्वत:हून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जागेतील अतिक्रमण काढण्यास सुरुवात केली आहे. आष्टा बसस्थानकासमोर रस्त्याच्या दोन्ही बाजूस सुमारे १२७ व्यावसायिकांनी सार्वजनिक बांधकामच्या जागेत लोखंडी खोकी टाकून सायकल दुरुस्ती, आॅटो पार्टस्, गॅरेज, बेकरी, स्टेशनरी, सलून, नाष्टा सेंटर यांसह विविध व्यवसाय गेल्या ३५ ते ४० वर्षांपासून सुरु ठेवले आहेत. रस्त्याच्या मध्यापासून १५ मीटरऐवजी ११ मीटरवर गटार, फूटपाथ आल्याने अनेक खोकीधारकांनी लाखो रुपये खर्चून दुकाने मागे घेतली. मात्र शासनाच्या आदेशाने जिल्हाधिकारी यांनी अतिक्रमण हटाव मोहीम सुरु केली. हे अतिक्रमण तीन दिवसात काढण्याबाबत त्यांना १८ जानेवारीस नोटीस देण्यात आली. सर्व खोकीधारकांनी दुकने तीन दिवस बंद ठेवून आ. जयंत पाटील, माजी आ. विलासराव शिंदे, वैभव शिंदे, नगराध्यक्षा सौ. मंगलादेवी शिंदे यांची भेट घेऊन, खोकी वाचविण्याबाबत विनंती केली. विलासराव शिंदे, वैभव शिंदे, सुनील माने, शैलेश सावंत यांनी जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह यांची भेट घेऊन, दुकाने वाचविण्याची व पर्यायी जागा देऊन पुनर्वसन करण्याची मागणी केली. जिल्हाधिकारी कुशवाह यांनी २0 जानेवारीच्या बैठकीत, तीन फेब्रुवारीअखेर सर्व खोकीधारकांनी हमीपत्र दिल्यास तीन महिन्यांची मुदतवाढ देण्याची ग्वाही दिली. मात्र तीन फेब्रुवारीअखेर एकाही खोकीधारकाने हमीपत्र दिले नाही. पालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने ४ फेब्रुवारी रोजी अतिक्रमणे काढण्यासाठी एक्साव्हेटर, जेसीबी, डंपर, ट्रॉली, तसेच पालिकेचे व सार्वजनिक बांधकामचे कर्मचारी यांसह जय्यत तयारी केली. मात्र त्यांनी आष्टा पोलीस ठाण्याकडे पोलीस देण्याची मागणी करुनही अद्यापही पोलीस उपलब्ध न झाल्याने, अतिक्रमण हटाव मोहीम सुरु करण्यात आली नाही. सार्वजनिक बांधकाम विभागाला पोलीस खाते सहकार्य करणार, की पोलीस उपलब्ध नसल्याचे कारण देत मोहीम रखडणार, याबाबत खोकीधारकांत अस्वस्थता आहे. ४ फेब्रुवारी रोजी पाच खोकीधारकांनी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे हमीपत्र सादर केले, तर दि. ५ रोजी सुमारे ३४ खोकीधारक हमीपत्र देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात गेले. मात्र उशीर झाल्याचे कारण देत अधिकाऱ्यांनी हमीपत्रे स्वीकारण्यास नकार दिला. सर्वांनी विनंती केल्यानंतर दुपारी ४.३0 च्या दरम्यान रघुवीर कापसे, सलीम मुजावर, आयेशा कुलकर्णी, दिलावर मुजावर, अनिल भोसले, चंद्रकांत पाटील, चंद्रकांत बुधावले, श्रीधर शेट्टी, जमीर लतीफ, अभिजित माने, शहाजी डोंगरे, केशव चोपडे आदी ३४ खोकीधारकांनी हमीपत्र सादर केले. एकूण ३९ खोकीधारकांनी हमीपत्र दिले आहे. काही खोकीधारक सार्वजनिक बांधकामच्या जागेतील अतिक्रमण स्वत:हून काढून घेत आहेत. हॉटेल समृध्दीचे राकेश सावळवाडे, लक्ष्मी बिअर बारचे व लक्ष्मी बेकरीचे सार्वजनिक बांधकामच्या जागेतील दुकानगाळे, पत्रे छपरी व इतर सामान खोकीधारकांनी स्वत:हून काढून घेतले आहे. (वार्ताहर) हमीपत्र न देणाऱ्यांवर कारवाई : गाताडे
आष्ट्यात अतिक्रमण हटाव मोहीम तात्पुरती थंडावली
By admin | Updated: February 6, 2015 00:38 IST