मिरज : गुन्हा अन्वेषण विभागाने मिरजेत खतीबनगर येथे छापा टाकून सहा हजार रुपये किमतीचे ३५० लिटर रॉकेल जप्त केले. याप्रकरणी संजय अरविंद कोगेकर (वय ४७ ) या टँकर मालकास पोलिसांनी अटक केली, तर कोगेकर यांचा साथीदार फरार झाला आहे. खतीबनगर येथे संजय कोगेकर यांच्या मालकीचे इंधन वाहतूक करणारे तीन टँकर आहेत. टँकरमधील डिझेलमध्ये भेसळ करण्यासाठी कोगेकर यांनी घरात रॉकेलचा साठा केल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. गुन्हे अन्वेषण विभागाचे परमेश्वर नरळे, दीपक पाटील, शंकर पाटील, कुलदीप कांबळे यांच्या पथकाने आज दुपारी कोगेकर यांच्या घरात छापा टाकून ६ हजार २०० रुपये किमतीचे सार्वजनिक वितरणाचे रॉकेल जप्त केले. संजय कोगेकर यांचे वडील निवृत्त नायब तहसीलदार आहेत. रॉकेलचा काळाबाजार करण्यासाठी की टँकरमधील डिझेल भेसळ करण्यासाठी रॉकेलचा साठा करण्यात आला होता, याची चौकशी सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले. कोगेकर यास रॉकेल पुरवठा करणारा त्याचा साथीदार फरारी आहे. (वार्ताहर)
मिरजमध्ये अवैध रॉकेल साठा जप्त
By admin | Updated: August 22, 2014 23:19 IST