सांगली : जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढू लागल्याने जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी निर्बंध जाहीर केले आहेत. ते १५ एप्रिलपर्यंत लागू राहतील. हॉटेल्स, किराणा दुकाने, बेकरी, हातगाडे, चित्रपटगृहे, मॉल्स, सभागृह रात्री आठनंतर बंद राहतील. हॉटेल्समधून पार्सल सेवा, होम डिलिव्हरीला मात्र परवानगी राहणार आहे.
जिल्हाभरात जमावबंदी असून, पाचपेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र येता येणार नाही. आदेशाचा भंग करणाऱ्यास एक हजार रुपये दंड केला जाईल. बगीचे, मैदाने व सर्व सार्वजनिक ठिकाणे रात्री आठ ते सकाळी सातपर्यंत बंद राहतील. मास्क नसल्यास ५०० रुपये व सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास एक हजार रुपये दंड होईल. नियमांचे उल्लंघन केल्यास चित्रपटगृहे, मॉल्स, सभागृह, हॉटेल्स सील केली जातील. त्याशिवाय दंड व कायदेशीर कारवाईही होईल.
गृह अलगीकरणातील व्यक्तींची माहिती डॉक्टरांनी वैद्यकीय अधिकारी व स्थानिक स्वराज्य संस्थेला द्यायची आहे. रुग्णाच्या घरावर फलकही लावायचा आहे. रुग्णाच्या हातावर शिक्का मारावा लागेल. रुग्ण घराबाहेर पडल्यास संस्थात्मक अलगीकरण केले जाईल.
सरकारी कार्यालयांत गर्दी कमी करण्यासाठी सर्वसामान्यांना प्रवेश बंद आहे. लोकप्रतिनिधी आणि अतिमहत्त्वाची कामे असलेल्यांनाच प्रवेश मिळेल. एखाद्या बैठकीला येण्यासाठी संबंधित विभागप्रमुखांकडून प्रवेशपत्र दिले जाईल. पत्राशिवाय प्रवेश नसेल.
सर्व धार्मिक स्थळांमध्ये सोशल डिस्टन्सिंग राखूनच भाविकांना प्रवेश देता येईल. दर्शनासाठी ऑनलाईन आरक्षणासारख्या सुविधाही द्यायच्या आहेत. मास्कचा वापर व शरीराचे तापमान मोजावे लागेल. सार्वजनिक वाहतुकीला सशर्त परवानगी आहे. अटींचा भंग केल्यास ५०० रुपये दंड केला जाईल.
चौकट
असे असतील निर्बंध
- रात्री आठ ते सकाळी सातपर्यंत पाचपेक्षा जास्त व्यक्तींना एकत्र येण्यास मनाई
- किराणा, बेकरी, मॉल्स, सभागृह, हॉटेल्स, चित्रपटगृहे रात्री आठ ते सकाळी सातपर्यंत बंद, पार्सल सेवा, होम डिलिव्हरीला परवानगी
- सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, धार्मिक कार्यक्रमांना प्रतिबंध, सभागृह व नाट्यगृहातही कार्यक्रमांना बंदी
- लग्नासाठी ५० व अंत्यसंस्कारासाठी २० पेक्षा जास्त व्यक्तींना मनाई
चौकट
अंमलबजावणी सुरू
रविवारी संध्याकाळपासूनच पोलिसांनी आदेशाची अंमलबजावणी सुरू केली. रात्री आठ वाजताच किराणा दुकाने, बेकरी बंद करायला लावल्या. किरकोळ भाजीविक्रेत्यांना व्यवसाय बंद करायला लावले. पानटपऱ्याही बंद केल्या. यामुळे शहर व ग्रामीण भागात रात्री आठनंतर सामसूम होती, रस्ते निर्मनुष्य झाले.