अशोक डोंबाळे - सांगली केंद्र शासनाच्या आदेशानुसार जिल्हा मृद सर्वेक्षण व चाचणी विभागाने सांगली जिल्ह्यातील एक लाख ११ हजार ६०३ खातेदारांच्या जमिनीचे माती व पाणी परीक्षण केले आहे. या शेतकऱ्यांना दि. ५ डिसेंबर रोजी त्यांच्या जमिनीचे आरोग्यपत्र देण्यात येणार आहे. माती परीक्षणामध्ये जमिनीमधील स्फुरद, पालाश कमी झाल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. या जमिनीच्या खातेदार शेतकऱ्यांना रासायनिक खताऐवजी सेंद्रीय खताचा वापर करण्याच्या कृषी विभागाकडून सूचना देण्यात आल्या आहेत. केंद्र शासनाच्या आदेशानुसार जिल्हा मृद सर्वेक्षण व चाचणी विभागाने २०१५ते २०१८ या तीन वर्षाचा आराखडा तयार केला आहे. तीन वर्षात जिल्ह्यातील ५ लाख ३५ हजार खातेदारांना त्यांच्या जमिनीचे आरोग्यपत्र देण्यात येणार आहे. बागायत आणि जिरायत क्षेत्रातील मातीचे नमुने जीपीएस उपकरणाच्या साहाय्याने घेतले जात आहेत. यामुळे जमिनी क्षारपड होण्यापासून वाचविता येणार असून, एकरी उत्पादनही वाढण्यास मदत होणार आहे. म्हणूनच शासनाने या निर्णयास प्राधान्य दिल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. जिल्ह्यातील एक लाख एकराहून अधिक जमीन क्षारपड झाली आहे. एकरी उत्पादनही ५० टक्क्याने घटले आहे. जमिनीचा पोत न पाहता शेतकरी जादा उत्पादन मिळविण्यासाठी अती पाण्याचा आणि रासायनिक खताचा वापर करीत आहेत. यामुळे शेतीचे उत्पादन वाढण्याऐवजी जमिनी क्षारपड होण्याचे प्रमाण वाढले आहे. म्हणूनच केंद्र शासनाने जमिनीचे आरोग्य तपासण्यासाठी मृद आरोग्य अभियान राबविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार सांगलीतील जिल्हा मृद सर्वेक्षण व चाचणी विभागाच्या अधिकाऱ्यांनी २०१५ ते १८ असा तीन वर्षाचा जिल्ह्याचा आराखडा तयार केला होता. त्यापैकी खरीप आणि रब्बी हंगामातील एक लाख ११ हजार ६०३ खातेदारांच्या जमिनीचे माती परीक्षण केले आहे. माती परीक्षणमध्ये जमिनीमध्ये स्फुरद, पालाशचे प्रमाण घटले आहे. रासायनिक खताचा चुकीच्या पध्दतीने वापर आणि पिकाला पाण्याची गरज न ओळखता पाणी दिले जात असल्यामुळे जमिनीमध्ये क्षाराचे प्रमाण खूप वाढले आहे. याबद्दलही कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांकडून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे. या गावांमधील मातीची झाली तपासणी तासगाव तालुक्यातील कवठेएकंद, आरवडे, चिंचणी, कडेगाव तालुक्यातील खेराडेवांगी, नेवरी, हिंगणगाव खु., खानापूर तालुक्यातील विटा, भाळवणी, पारे, ढवळेश्वर, आटपाडी तालुक्यातील बनपुरी, राजेवाडी, गोमेवाडी, झरे, कामथ, हिवतड, निंबवडे, वाळवा तालुक्यातील कासेगाव, आष्टा, नेर्ले, धोत्रेवाडी, शिरटे, जत तालुक्यातील उमदी, उटगी, संख, मिरज तालुक्यातील म्हैसाळ, खंडेराजुरी, आरग, सलगरे, वड्डी, शिराळा तालुक्यातील कांदे, शिराळा, सागाव, कणदूर, मांगले, पलूस तालुक्यातील नागठाणे, वसगडे, कवठेमहांकाळ तालुक्यातील कवठेमहांकाळ, राजंणी या गावांचा समावेश आहे. जमिनीची सुपिकता टिकविण्यासाठी केंद्र व राज्य शासनाने माती परीक्षणाचा महत्त्वपूर्ण प्रयोग हाती घेतला आहे. यावर्षी आपण एक लाखाहून अधिक शेतकऱ्यांना जमिनीचे आरोग्यपत्र वाटप करणार आहे. याचा जमिनीचे उत्पन्न वाढविण्याच्यादृष्टीने शेतकऱ्यांना निश्चित फायदा होणार आहे. शेतकऱ्यांनी स्वत:हून माती परीक्षण करून खताचा वापर करावा, असे जिल्हा मृद सर्वेक्षण व मृद चाचणी अधिकारी प्रकाश कुंभार यांनी सांगितले.
सांगली जिल्ह्यातील जमिनीचे आरोग्य बिघडले
By admin | Updated: November 29, 2015 00:59 IST