नेर्ले : नेर्ले (ता. वाळवा) येथे कोरोनाचा संसर्ग वाढू लागला असून गावामध्ये ६३ रुग्ण आहेत. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी बुधवारपासून पाच दिवसांचा जनता कर्फ्यू लावण्याचा निर्णय सरपंच छायाताई रोकडे यांनी जाहीर केला.
आपत्ती व्यवस्थापन समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. ५ मे ते ९ मे अखेर याची अंमलबजावणी केली जाईल. दूध डेअरी व औषध दुकाने चालू राहतील. अन्य सर्व व्यवहार या कालावधीत बंद ठेवण्यात येतील. गावात येणारे सर्व मार्ग सील करण्यात येणार आहेत. अत्यावश्यक बाब वगळता अन्य कोणालाही गावात प्रवेश दिला जाणार नाही. या कालावधीत विनाकारण फिरणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत.
ग्रामपंचायतीने निर्जंतुकीकरण करण्यासाठी औषध फवारणी चालू केली आहे. बाधितांच्या घरातील कोणीही व्यक्ती बाहेर फिरताना आढळल्यास त्यांच्यावरही गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. कासेगाव पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक अविनाश मते, माजी सरपंच संभाजी पाटील, संजय गांधी निराधार योजनेचे तालुकाध्यक्ष संजय पाटील, उपसरपंच विश्वास पाटील, ग्रामविकास अधिकारी एम. डी. चव्हाण, तलाठी पंडित चव्हाण, वैद्यकीय अधिकारी सागर शिंदे, अनिल साळुंखे उपस्थित होते.