ओळी :
कोविड टास्क फोर्सचे संचालक तथा आरोग्य सल्लागार डाॅ. सुभाष साळुंखे यांनी गुरुवारी सांगलीत महापालिकेला भेट देत कोरोना स्थितीचा आढावा घेतला. यावेळी आयुक्त नितीन कापडणीस, दत्तात्रय लांघी, राहुल रोकडे उपस्थित होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : जिल्ह्यात कोरोनाची वाढती संख्या चिंताजनक आहे. त्यासाठी कोरोना सुपर स्प्रेडर्सचा शोध घेऊन त्यांचे तातडीने लसीकरण करा, अशी सूचना आरोग्य सल्लागार डाॅ. सुभाष साळुंखे यांनी गुरुवारी केली. कोरोना रुग्णांची संख्या पाहून ऑक्सिजन, स्टेरॉईडसह अनुषंगिक औषधांचा बफर स्टॉक ठेवा, असा सल्लाही त्यांनी दिला.
राज्यात कोरोनाची लाट ओसरत असताना सांगली जिल्ह्यात मात्र रुग्णसंख्या घटलेली नाही. त्याचा आढावा घेण्यासाठी डॉ. साळुंखे जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. त्यांनी जिल्हा प्रशासन व महापालिकेत बैठक घेतली. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी, जिल्हा पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी, महापालिका आयुक्त नितीन कापडणीस, अधिष्ठाता डॉ. सुधीर नणंदकर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय साळुंखे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मिलिंद पोरे उपस्थित होते.
सुभाष साळुंखे म्हणाले, जिल्ह्यात आरोग्याच्या पायाभूत सुविधा चांगल्या आहेत. कोविड कंट्रोल रूमची संकल्पनाही चांगल्या पद्धतीने राबविली जात आहे. तरीही कोरोनावाढीचा वेग स्थिर असून रुग्णसंख्येत घट न होणे चिंताजनक आहे. होम आयसोलेशनच्या आग्रहामुळे रुग्णसंख्या कमी झाली नाही. त्यामुळे संस्थात्मक विलगीकरणावर भर द्या.
खासगी रुग्णालयातील एचआरसीटी चाचण्यांवरही अंकुश ठेवण्याची आवश्यकता आहे. कंटेनमेंट झोनची अंमलबजावणी पहिल्या टप्प्यात अत्यंत प्रभावी झाली होती. पण, दुसऱ्या टप्प्यात प्रभावहीन झाली आहे. त्यामुळे कंटेनमेंट झोनची अंमलबजावणी काटेकोरपणे करावी. त्यासाठी पोलीस, महसूल प्रशासन, ग्राम दक्षता समिती यांनी अधिक जबाबदारी घ्यावी. ग्राम दक्षता समितीने सुपर स्प्रेडर लोकांना शोधून त्यांचे तातडीने लसीकरण करून घ्यावे. शहरी भागात लोकसंख्येची घनता जास्त असल्याने रुग्णसंख्या व रुग्णसंख्या वाढीचा वेगही जास्त आहे. याला तालुका आरोग्य प्रशासन, नगरपालिका व महापालिकांची यंत्रणाही जबाबदार आहे. तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर, व्हेंटिलेटर, औषधे, साहित्य, पुरेसे मनुष्यबळ यांचे काटेकोर नियोजन ठेवण्याची गरज आहे, असे साळुंखे यांनी सांगितले.
चौकट
टास्क फोर्सच्या सूचना
होम आयसोलेशनऐवजी संस्थात्मक विलगीकरणावर भर द्या
कंटेनमेंट झोनची काटेकोरपणे अंमलबजावणी करा
खासगी रुग्णालयातील एचआरसीटी चाचण्यांवर अंकुश ठेवा
ऑक्सिजन, स्टेरॉईडसह अनुषंगिक औषधांचा बफर स्टॉक ठेवा
पोलीस, महसूल प्रशासन, ग्राम दक्षता समित्या अधिक सक्षम करा