सांगली : सुगंधित तंबाखूवर बंदी, सिगारेट विक्रीवर बंदी, असे निर्णय घेऊन राज्यातील लाखो पानटपरी चालकांचा संसार उद्ध्वस्त करण्याचा शासनाचा प्रयत्न सुरू आहे. मात्र आम्ही असे होऊ देणार नाही. तंबाखूवरील बंदी उठेपर्यंत आमचा लढा सुरूच राहील. प्रसंगी रक्त सांडले तरी चालेल, असा इशारा महाराष्ट्र पान व्यापारी महासंघाचे प्रदेशाध्यक्ष अजित सूर्यवंशी यांनी आज (मंगळवार) दिला.जिल्ह्यातील पानटपरी चालकांचा आमराई येथे मेळावा आयोजित केला होता. त्यावेळी सूर्यवंशी बोलत होते. ते म्हणाले की, गुटख्यावर बंदी घातल्यानंतर कोणताही विरोध केला नाही. मात्र सुगंधित तंबाखूवर बंदी घालण्यामागे पान व्यवसाय बंद पाडण्याचा डाव आहे. यामुळे बंदी उठविण्यासाठी शासनाविरुद्ध दीड वर्षापासून लढा सुरू आहे. राज्यातील लाखो पानटपरी चालकांची कुटुंबे या व्यवसायावर चालतात, याची शासनाने दखल घेतली पाहिजे. तंबाखूवरील बंदी उठविण्यासाठी आंदोलनाचे पहिले रणशिंग सांगलीत फुंकले गेले. त्यानंतर राज्यभरातील पानटपरी चालक या आंदोलनात सहभागी झाले. युसूफ जमादार यांनी स्वागत व रत्नाकर नांगरे यांनी प्रास्ताविक केले. यामध्ये आतापर्यंत झालेली आंदोलने व पुढे काय करणार आहोत, याविषयी भूमिका स्पष्ट केली. एकनाथ सूर्यवंशी, बापू कारंडे, बिराप्पा पुजारी, रामचंद्र सूर्यवंशी, प्रवीण लाड, आनंद येवले आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)दुकान फोडा, पेटवा!सूर्यवंशी म्हणाले की, संघटनेच्या लढाईत सर्वांनी सहभागी व्हायला हवे. आम्ही ज्यावेळी हाक मारू, त्यावेळी तुम्ही व्यवसाय बंद करून आले पाहिजे. मात्र तसे होताना दिसत नाही. येथून पुढे आंदोलन काळात व्यवसाय सुरू ठेवणाऱ्यांचे दुकान फोडा किंवा पेटवून द्या; कोणाचीही गय करू नका.
तंबाखूवरील बंदी उठेपर्यंत लढा
By admin | Updated: December 30, 2014 23:29 IST