सांगली : जिल्ह्याच्या पूर्वभागातील टंचाईग्रस्त भागासाठी वरदायी असलेल्या म्हैसाळ योजनेच्या आवर्तनाचा प्रश्न अजून तरी अधांतरीच आहे. गेल्या आठवड्यात खासदारांनी आणि जिल्हाधिकाऱ्यांनी केलेल्या आवाहनास शेतकऱ्यांनी प्रतिसाद देण्यास सुरुवात केली असताना, साखर कारखानदारांनी मात्र रक्कम भरण्यास ठेंगा दाखविला आहे. त्यामुळे म्हैसाळ योजनेतून पाणी सुटण्याची धाकधूक कायम आहे. दरम्यान, प्रशासनाने सुरु केलेल्या वसुली मोहिमेस प्रतिसाद मिळत असून, दोन दिवसात २ लाख ७५ हजाराची वसुली झाली आहे. मिरज पूर्वभागासह कवठेमहांकाळ, तासगाव व जत तालुक्यातील टंचाई परिस्थिती गंभीर रूप धारण करत असून, केवळ शेतीलाच नव्हे, तर पिण्याच्या पाण्यासाठीही वणवण भटकण्याची वेळ ग्रामस्थांवर आली आहे. या पार्श्वभूमीवर खासदार पाटील आणि जिल्हाधिकारी गायकवाड यांनी पुढाकार घेत मिरज आणि कवठेमहांकाळ तालुक्यात बैठका घेतल्या. शेतकऱ्यांना थकबाकी भरण्यासाठी आवाहन केले आहे. गेल्या आठवड्यात जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत साखर कारखानदारांनाही वसुलीसाठी सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्याबरोबरच थकबाकी पैकी ५ कोटी २५ लाखांची थकबाकी कारखानदारांनी भरावी व त्यांनी त्याची वसुली शेतकऱ्यांकडून करावी, असा निर्णय घेण्यात आला होता. विशेष म्हणजे बैठकीस उपस्थित कारखानदारांच्या प्रतिनिधींनी दोन दिवसात ठरवून दिलेली रक्कम भरण्याचे आश्वासन दिले होते मात्र, यास पंधरा दिवसांचा कालावधी उलटला तरीही अजून प्रतिसाद न मिळाल्याने या रकमेची वसुली कशी करायची, हा प्रश्नच आहे. बैठकीनंतर दोन दिवसात पैसे भरण्याचा शब्द देणाऱ्या कारखानदारांनी आता यात वेगवेगळे मत मांडण्यास सुरुवात केल्याने खासदारांच्या या मध्यस्थीला अपयश आल्याचेच चित्र आहे. म्हैसाळ योजनेच्या क्षेत्रात उसाचे क्षेत्र कमी असून, याउलट द्राक्षबागांचे क्षेत्र अधिक असल्याचा युक्तिवाद आता कारखानदार करु लागल्याने थकबाकी भरण्यासाठी मोठ्या रकमेचा भार उचलणारे कारखानदार चालढकल करत असल्याचेच स्पष्ट झाले आहे. या विषयावर म्हैसाळ योजनेच्या कार्यक्षेत्रातील पाच कारखानदारांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, महांकालीचे अध्यक्ष विजय सगरे, मनोज शिंदे वगळता इतरांशी संपर्क होऊ शकला नाही. राजकारण नेत्यांचे : भरडणे जनतेचे... केवळ कारखानदारच नव्हे, तर या भागातील राजकीय पक्षांच्या वेगवेगळ्या भूमिकांचा फटकाही आता योजनेस बसू लागला आहे. खासदार आणि भाजपच्यावतीने वसुलीसाठी प्रयत्न चालवले असतानाच राष्ट्रवादीने मात्र शेतकऱ्यांकडून थकबाकी वसुलीस कडाडून विरोध केल्याने थकबाकी वसुलीचे भिजत घोंगडे कायम राहिल्याचे चित्र आहे. यात सर्वसामान्य शेतकरी आणि पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करत असलेले ग्रामस्थ भरडत चालले आहेत. मालगाव, बेडग, बेळंकीतून वसुली या साऱ्या घडामोडीत प्रशासनाने मात्र आपल्यापरीने वसुलीस सुरुवात केली आहे. शुक्रवारपासून मिरज पूर्वभागात वसुलीस सुरुवात झाली असून, पूर्व भागातील मालगाव, बेडग आणि बेळंकी या गावात वसुलीस चांगला प्रतिसाद मिळाला. दोन दिवसात २ लाख ७५ हजारांची वसुली झाल्याचे प्रशासनाच्यावतीने सांगण्यात आले.
ताकारी योजनेसाठीचे नियम अथवा वसुलीची पध्दत म्हैसाळ योजनेला लावणे चुकीचे आहे. कारण म्हैसाळ योजनेच्या क्षेत्रात केवळ ३५ टक्के उसाचे क्षेत्र असून, ६५ टक्के इतर पिके घेतली जातात. तरीही बैठकीत ठरल्याप्रमाणे थकबाकीच्या रकमेबाबत काय करावयाचे, याबाबत दोन दिवसात निर्णय घेण्यात येणार आहे. म्हैसाळ योजनेचे आवर्तन सुरु व्हावे, ही सर्वांचीच इच्छा आहे. -विजय सगरे, अध्यक्ष, महांकाली साखर कारखाना, कवठेमहांकाळ शनिवारी जलसंपदा मंत्री विजय शिवतारे यांची भेट घेऊन म्हैसाळ योजनेतून पाणी सोडण्याबाबत चर्चा केली. शेतकऱ्यांनी केवळ वीजबिल भरण्यास सहकार्य करावे, असे आवाहन केले. पाणीपट्टीची रक्कम पूर्णपणे माफ करावी, अशी आम्ही मागणी केली असून, त्याचा विचार करण्याचे आश्वासन शिवतारे यांनी दिले आहे. यावर्षीच्या आवर्तनासाठी त्यांनी विजबिलाची रक्कम भरावी, असे आवाहन केले असून, त्यास अनुसरुन तासगाव व कवठेमहांकाळ तालुक्यातील शेतकऱ्यांची लवकरच बैठक घेणार असून, त्यात शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकून निर्णय घेतला जाईल. शेतकऱ्यांवर कोणताही जादा भार न पडता पूर्वीप्रमाणेच पाणी मिळावे, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. -आमदार सुमनताई पाटील