सांगली : डॉक्टर आणि रुग्ण यांच्या नात्यांमध्ये संवादाला अनन्यसाधारण महत्त्व असून, रुग्णांचे कौटुंबिक स्वास्थ्य चांगले राहण्यात व टिकविण्यात फॅमिली डॉक्टरांची महत्त्वाची भूमिका असल्याचे मत ज्येष्ठ मनोविकास तज्ज्ञ डॉ. आनंद नाडकर्णी यांनी व्यक्त केले. जनरल मेडिकल प्रॅक्टिशनर्स फोरम सांगलीच्यावतीने आयोजित ‘शुभंकर’ या वैद्यकीय चर्चासत्रात ते ‘संवादकौशल्य’ या विषयावर बोलत होते. डॉ. नाडकर्णी म्हणाले, फॅमिली डॉक्टर या नात्याने आपल्याकडे येणाऱ्या रुग्णाची भावना समजून घेऊन त्याच्याशी संवाद साधला पाहिजे. रुग्णांनी डॉक्टरांपाशी मनमोकळेपणाने बोलले पाहिजे. यासाठी दोघांच्यात संवाद चांगला असणे गरजेचे आहे. याकरिता रुग्णाच्या मनात प्रथम असा विश्वास डॉक्टरांनी निर्माण करणे गरजेचे आहे. रुग्णालयात आलेल्या रुग्णांची आस्थेवाईकपणे चौकशी केली पाहिजे. वास्तविक आस्था आणि सहानुभूतीने वागले तर, त्याचा सर्वत्र क्षेत्रात लाभ होतो. आपला विकास होण्यास याचा निश्चित हातभार लागतो. आस्था ही सर्वात उन्नत भावना आहे. याचा सुयोग्य वापर डॉक्टर आणि रुग्ण यांनी केला, तर त्यांच्या नात्याला नवीन आकार येईल.याप्रसंगी ‘सोशल मीडिया आणि वयात येणाऱ्या मुलांच्या पालकांसमोरील प्रश्न’ या विषयावर बालरोग तज्ज्ञ चित्रा दाभोलकर यांनी मार्गदर्शन केले. दाभोलकर म्हणाल्या, सोशल मीडियामुळे जग जवळ आले असले तरी, आपण मात्र एकमेकांपासून दूर होत चाललो आहोत. संभाव्य धोके लक्षात घेऊन विद्यार्थ्यांना सोशल मीडिया हाताळण्यात किती स्वातंत्र्य द्यायचे, याचा विचार पालकांनीच केला पाहिजे. ‘मनोविकार शास्त्र - काल, आज आणि उद्या’ या विषयावर मनोविकार तज्ज्ञ डॉ. एन. एम. पाटील यांनी विचार व्यक्त केले. ‘कौटुंबिक, मानसिक स्वास्थ्य रक्षणामध्ये फॅमिली डॉक्टरांची भूमिका’ या विषयावरील परिसंवादात डॉ. नाडकर्णी, डॉ. दाभोलकर, डॉ. समीर गुप्ते, डॉ. चंद्रशेखर हळिंगळे, डॉ. चारुदत्त कुलकर्णी यांनी सहभाग घेतला. यावेळी फोरमचे अध्यक्ष डॉ. दिलीप शिंदे, विनोेद शिंदे, अभिषेक दिवाण, आनंद पोळ आदी उपस्थित होते. डेक्कन मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशन सभागृहात झालेल्या एकदिवसीय चर्चासत्र कार्यक्रमास जिल्ह्यातील ७०० हून अधिक डॉक्टर सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)
कौटुंबिक स्वास्थ्यासाठी डॉक्टर महत्त्वाचे
By admin | Updated: February 2, 2015 00:10 IST