फोटो आहे...
अविनाश कोळी
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : देशात कोरोनाची वाढत असलेली तीव्रता, ऑक्सिजनचा तुटवडा यामुळे देशांतर्गत ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर यंत्राच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे. चीनहून होणारी आयातही मंदावल्यामुळे याच्या दरात दुप्पट वाढ झाली आहे. महाराष्ट्रात लोक या यंत्रासाठी आता प्रतीक्षा यादीवर आहेत.
‘एआयएमईडी’ या संस्थेच्या अभ्यासानुसार भारतात यापूर्वी प्रतिवर्षी ४० हजार ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर यंत्रांची विक्री होत होती. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत आता महिन्याला ३० ते ४० हजार यंत्रांची मागणी होत आहे. मागणी वाढत असताना चीनहून येणाऱ्या अनेक वैद्यकीय उपकरणांचे दर वाढत आहेत. त्यात पोर्टेबल ऑक्सिजन यंत्रांच्या किमतीही दुपटीने वाढल्या आहेत. देशांतर्गत अशा यंत्रांची निर्मिती होत असली तरी ती कमी प्रमाणात होते. याशिवाय चीनच्या यंत्राच्या तुलनेत त्याची किंमत अधिक आहे. त्यामुळे चीनच्या यंत्रांना अधिक मागणी होत आहे. येत्या काही महिन्यात या मागणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्रातील अनेक वितरकांकडील ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर यंत्रे संपली आहेत. मागणी असली तरी त्याचा पुरवठा त्यांना करता येत नसल्याची स्थिती आहे. ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे सध्या या यंत्रांचा वापर वाढला आहे, मात्र त्याच्याही तुटवड्याचा सामना रुग्णांना व त्यांच्या नातेवाइकांना करावा लागत आहे.
चौकट
हे यंत्र काय करते?
ऑक्सिजन काॅन्सन्ट्रेटर हे यंत्र हवेतून ऑक्सिजन खेचून घेत ते रुग्णाला उपलब्ध करून देते. हवेतून आलेले नायट्रोजन ते पुन्हा हवेत सोडून देते. त्याची ऑक्सिजन शुद्धता ९० ते ९५ टक्के इतकी असते. या शुद्धतेवर यंत्रांच्या किमती ठरतात.
चौकट
दरांचा चढता आलेख
बाजारात ५, ७ व १० लीटरचे कनर्व्हर उपलब्ध असून, सर्वाधिक मागणी ५ व ७ लीटरच्या यंत्राला आहे. यातील ७ लीटरचे जे यंत्र पहिल्या कोरोना लाटेवेळी २७ ते २८ हजार रुपयांना मिळत होते, ते आता ६० हजार रुपयांवर गेले आहे.
कोट
मागील वर्षापेक्षा यंदा या यंत्रांच्या मागणीत कित्येक पटीने वाढ झाली आहे. मागणी असली तरी आम्ही त्याचा पुरवठा करू शकत नाही. सध्या एकही यंत्र आमच्याकडे विक्रीसाठी शिल्लक नाही.
- अनुप शहा, ऑक्सिजन यंत्र वितरक, सांगली