सांगली : पीएम केअरमधून जिल्ह्याला तब्बल १५२ व्हेंटिलेटर्स मिळाले खरे, पण त्यातले २० बिनकामाचे आणि बाकीचे चालेचनात अशी स्थिती आहे. आरोग्य यंत्रणेने स्थानिक स्तरावर जुगाड करीन ते कार्यान्वित केले, पण अजूनही २० व्हेंटिलेटर बंद अवस्थेतच आहेत.
व्हेंटिलेटरबाबतीत जिल्ह्याची स्थिती आणीबाणीची आहे. व्हेंटिलेटर बेड मिळत नसल्याने अनेकांना प्राणास मुकावे लागत आहे. जिल्ह्यात गेल्या जानेवारीपर्यंत ३२५ व्हेंटिलेटर होते. त्यानंतर विविध स्तरावरून उपलब्ध होत गेले. गेल्या महिन्यात पीएम केअरमधून एकदम १५२ व्हेंटिलेटर मिळाले, त्यामुळे आरोग्य यंत्रणेला आनंदाच्या उकळ्या फुटल्या, पण त्यांचे खरे स्वरूप पुढे येताच त्यांच्या आनंदावर विरजण पडले. सरकारी छापाची उपकरणे कशी भ्रष्टाचाराने पोखरलेली असतात याचे उत्तम उदाहरण म्हणून व्हेंटिलेटरकडे बोट दाखविले गेले. असून अडचण आणि नसून खोळंबा अशी त्यांची अवस्था झाली.
संपूर्णत: इलेक्ट्रॉनिक उपकरण असल्याने त्यांची दुरुस्ती स्थानिक स्तरावर शक्य नव्हती, पण नादुरुस्तीच्या कारणास्तव ती परत पाठविली, तर पुन्हा लवकर मिळण्याची सुतराम शक्यता नव्हती. कोरोनाच्या आणीबाणीच्या काळात काहीही करून ती वापरात आणणे हा एकमेव पर्याय आरोग्य यंत्रणेपुढे होता. त्यामुळे शासकीय रुग्णालयाच्या बायोमेडिकल अभियंत्यांनी आपले कसब पणाला लावून व्हेंटिलेटर्समध्ये प्राण फुंकले.
चौकट
सेन्सर बंद, सॉफ्टवेअरही जुळेना
काही व्हेंटिलेटरच्या सेन्सरमध्ये बिघाड होता. अनेक व्हेंटिलेटरच्या सॉफ्टवेअरमध्येही समस्या आहेत. अजूनही त्या सुटलेल्या नाहीत. मिरज कोविड रुग्णालयात २० व्हेंटिलेटर्स बसवले, त्यापैकी अनेकांना सॉफ्टवेअरची समस्या होती. काहींच्या सेन्सरमध्ये बिघाड होता. काही तास-दोन तासांतच बंद पडायचे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना डोळ्यांत तेल घालून त्यावर लक्ष ठेवायला लागायचे. रुग्णालयाने तंत्रज्ञाच्या मदतीने ते सुरू केले, त्यानंतरही अद्याप चार बंदच आहेत.
चौकट
रुग्णालयातील इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या तसेच व्हेंटिलेटर्ससाठी कंपनीकडून वॉरंटी कालावधी आहे. पीएम केअरमधून मिळालेल्या बहुतांशी व्हेंटिलेटर्समध्ये खूपच मोठ्या संख्येने तांत्रिक बिघाड आहेत. ती सर्वच कंपनीकडे दुरुस्तीसाठी परत पाठविणे गैरसोयीचे होते. त्यामुळे राज्य शासनाने प्रत्येक रुग्णालयाला बायोमेडिकल इंजिनिअर कंत्राटी स्वरूपात नेमण्याचे आदेश दिले. सध्या त्यांच्याकडून व्हेंटिलेटर्स दुरुस्त करून घेतले जात आहेत.
चौकट
ग्रामीण भागात रामभरोसे
कवठेमहांकाळ, तासगाव आदी ग्रामीण रुग्णालयांतही व्हेंटिलेटर्स आहेत, पण सांगली-मिरजेप्रमाणे तेथे तंत्रज्ञ उपलब्ध नाही. बिघाड होतो, तेव्हा कंपनीच्या तंत्रज्ञाची वाट पहावी लागते किंवा सांगली-मिरजेतून तंत्रज्ञ पाठविण्यासाठी मिनतवाऱ्या कराव्या लागतात.
ग्राफ
जिल्ह्यात एकूण मिळाले १५२
सुरू १३०
मिरज कोविड रुग्णालयाला मिळाले २०
सुरू १६
कोट
जिल्ह्याला पीएम केअरमधून १५२ व्हेंटिलेटर्स मिळाले. पैकी अनेकांत बिघाड आहेत. रुग्णालयाच्या स्तरावर बायोमेडिकल अभियंता नियुक्त करून त्याच्यामार्फत दुरुस्त्या केल्या जात आहेत. व्हेंटिलेटर्स बंद राहून रुग्णांना प्राणवायूचा तुटवडा होऊ नये याची काळजी घेतली जात आहे. व्हेंटिलेटर्समध्ये बिघाडांचे प्रमाण जास्त आहे, पण प्रयत्न करून ते सुरू ठेवले आहेत.
- डॉ. संजय साळुंखे, जिल्हा शल्यचिकित्सक.