आटपाडी : दिघंची (ता. आटपाडी) येथे आपल्या मावशीकडे आलेल्या युवतीस जबरदस्तीने पळवून नेणाऱ्या चार तरुणांना राजेवाडी येथील ग्रामस्थांनी अडविले. त्यातील एकास पकडून बेदम चोप देत पोलिसांच्या हवाली केले. इतर तिघे पळून जाण्यात यशस्वी झाले. हा प्रकार रविवारी दुपारी दोनच्या सुमारास घडला. वैभव दत्तात्रय जाधव (रा. मळोली, जि. सोलापूर) असे संशयिताचे नाव असून त्याच्यासह संजय दत्तू मगर, नीलेश मल्ल्या मगर, विजू शेटे (तिघेही रा. निमगाव, ता. माळशिरस, जि. सोलापूर) यांच्यावर आटपाडी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फळवणी (ता. माळशिरस, जि. सोलापूर) येथील युवती यादव मळा, दिघंची येथील मावशीकडे राहण्यास आली आहे. आज दुपारी दीडच्या सुमारास लहान मुलीला अंगणात अंघोळ घालीत असताना दुचाकीवरून संजय मगर तीन साथीदारांसह आला. त्याने युवतीला जबरदस्तीने उचलून दुचाकीवर बसवले. इतरांनी घराला बाहेरून कडी लावली. यावेळी युवतीने आरडाओरडा केला, पण त्यांनी राजेवाडीच्या दिशेने पलायन केले. दरम्यान, या प्रकाराची माहिती युवतीच्या नातेवाइकांनी राजेवाडी येथील काही ग्रामस्थांना दिली. त्यानुसार राजेवाडीतील दोनशे ग्रामस्थांनी रस्ता रोखून धरला. ग्रामस्थांनी रस्ता अडविल्याचे पाहताच दुचाकी व युवतीला तेथेच सोडून चौघांनीही पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, ग्रामस्थांनी पाठलाग करून वैभव जाधवला दुचाकीसह (क्र. एमएच ४५, डब्ल्यू १३५६) पकडले. त्याला चोप देत पोलिसांच्या हवाली केले. यातील मुख्य सूत्रधार संजय मगर व त्याच्या दोन साथीदारांचा पोलीस शोध घेत आहेत. (वार्ताहर)
दिघंचीत युवतीच्या अपहरणाचा प्रयत्न
By admin | Updated: December 22, 2014 00:17 IST