लोकमत न्यूज नेटवर्क
आष्टा : येथील उपनगराध्यक्षपदी धैर्यशील झुंजारराव शिंदे यांची मंगळवारी बिनविरोध निवड झाली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नगराध्यक्षा स्नेहा माळी यांनी काम पाहिले. यावेळी गुलालाची उधळण व फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली.
उपनगराध्यक्ष शेरनवाब देवळे यांनी राजीनामा दिल्यानंतर आष्टा शहर विकास आघाडीच्या वतीने धैर्यशील शिंदे यांचा एकमेव अर्ज भरण्यात आला होता. त्यामुळे बिनविरोध निवड झाली. निवडीनंतर वैभव शिंदे, विशाल शिंदे, जिल्हा बँकेचे संचालक झुंजारराव शिंदे, जिल्हा नियोजन समिती सदस्य झुंजारराव पाटील, दिलीप वग्याणी, संग्राम फडतरे, विराज शिंदे, रघुनाथ जाधव, सुभाष देसाई, नागेश देसाई उपस्थित होते.
धैर्यशील शिंदे म्हणाले की, सर्वांना सोबत घेऊन नजीकच्या काळात उर्वरित विकासकामे मार्गी लावणार आहोत.
चौकट
बापू, शिंदे यांना अभिवादन
शिंदे गटातील पदाधिकाऱ्यांनी क्वचितच लोकनेते राजारामबापू पाटील यांच्या पुतळ्यास अभिवादन केले. मात्र धैर्यशील शिंदे उपनगराध्यक्ष झाल्यानंतर त्यांनी प्रथम लोकनेते राजारामबापू पाटील आणि दिवंगत विलासराव शिंदे यांना अभिवादन केले.