नरवाड : पाटबंधारे खात्याच्या ढिसाळ व्यवस्थापनामुळे म्हैसाळ जलसिंचन योजनेच्या पाणी मागणी अर्जाबाबत शेतकऱ्यांतून उदासीनता दिसून येत आहे. थकित पाणीपट्टीअभावी कृष्णा खोरेच्या म्हैसाळ प्रकल्पाची वीज जोडणी विद्युत वितरण कंपनीने तोडली आहे, असा आरोप पाटबंधारे खाते शेतकऱ्यांवर नेहमीच करीत आहे. मात्र हंगामनिहाय नियमित आवर्तने सुरू ठेवल्यास पाणीपट्टी भरण्यास शेतकरी कचरणार नसल्याच्या प्रतिक्रिया शेतकऱ्यांतून व्यक्त होत आहेत. पाटबंधारे खात्याकडे पाणी सोडण्याची कोणतीही ठोस भूमिका नसल्याने आजवर पिके वाळून गेल्यानंतरच प्रकल्पातून पाणी सोडण्यात आले आहे. यातही निकृष्ट दर्जाच्या कामाच्या फटक्यामुळे पाणी गळतीचा बोजा शेतकऱ्यांच्या माथ्यावर मारला जात आहे. शेतकरी पाणीपट्टी भरण्यास तयार आहेत, मात्र पाटबंधारे खात्याने आकारलेली पाणीपट्टीच शेतकऱ्यांना मान्य नाही. म्हैसाळ प्रकल्पाच्या अपुऱ्या कामाचाही परिणाम पाणीपट्टीच्या दरवाढीवर होत आहे. पाणी पोहोचल्यास पाणीपट्टी भरणे शेतकऱ्यांच्या आवाक्यात येणार आहे. राज्य शासनाच्या टंचाई निधीतून थकित वीज देयके आजवर वेळोवेळी भरली गेल्याने शेतकऱ्यांना शेतीस पाणी सहजगत्या मिळत होते. मात्र चालू शासनाने पाणी सोडण्यास ताठर भूमिका घेतल्याने भविष्यात म्हैसाळ प्रकल्पातून पाणी मिळणे कठीण होणार आहे. म्हैसाळ प्रकल्पाच्या खंडित पाणी पुरवठ्यामुळे कोणतीही खात्रीशीर पिके घेता येत नसल्याने शेतकरी द्विधा मन:स्थितीत अडकला आहे. त्यामुळे पाणी मागणी अर्ज भरून देण्यास टाळाटाळ होत आहे. दरम्यान, एक एप्रिलच्या शासनाच्या अध्यादेशाला शेतकरी कितपत प्रतिसाद देतात, यावर म्हैसाळ प्रकल्पाचे भवितव्य अवलंबून राहणार आहे. (वार्ताहर)पाटबंधारे खात्याने पाणी सोडण्याचे वेळापत्रक तयार करून पाणी मागणीच्या अर्जाबरोबर शेतकऱ्यांना दिले पाहिजे. ज्या शेतकऱ्यांनी म्हैसाळ प्रकल्पाचे पाणाी पाजले नाही, पण त्यांच्या विहिरी आणि कूपनलिकेच्या पाण्याच्या पातळ्या वाढल्या आहेत, अशा शेतकऱ्यांना एकरी मायनर पद्धत अवलंबली पाहिजे.- नेताजीराव निंबाळकर, प्रगतशील शेतकरी, नरवाड (ता. मिरज)लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेण्याची गरजम्हैसाळ उपसा सिंचन योजनेचे पाणी बंद राहिल्यामुळे उन्हाळी पिके वाळू लागली आहेत. यामुळे शेतकऱ्यांचा त्याचा मोठा फटका बसणार आहे. यामुळे लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेऊन पाण्याचा प्रश्न सोडविण्याची मागणी होत आहे.अधिकाऱ्यांनीही शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाणीपट्टी भरण्याबाबत त्यांचे प्रबोधन करण्याची गरज आहे.
पाणी मागणी अर्जाबाबत शेतकऱ्यांमध्ये उदासीनता
By admin | Updated: April 3, 2015 00:37 IST