मिरज : मिरज औद्योगिक वसाहत परिसरातील कारखान्यातील चार कामगारांना डेंग्यूसदृश तापाची लागण झाल्याने त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. डेंग्यू तापाच्या साथीची महापालिका आरोग्य विभागाला माहिती नसल्याचे आरोग्य अधिकारी डॉ. सुनील आंबोळे यांनी सांगितले.पावसामुळे ठिकठिकाणी साचलेले पाणी, स्वच्छतेअभावी निर्माण झालेली दुर्गंधी यामुळे डासांचा उपद्रव वाढला आहे. मिरज औद्योगिक वसाहतीत एका कारखान्यात वास्तव्य करणाऱ्या चार परप्रांतीय कामगारांना डेंग्यूसदृश तापाची लागण झाल्याने त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. औद्योगिक वसाहत व शहरातही अस्वच्छतेमुळे डासांचा उपद्रव वाढल्याने डेंग्यूसदृश तापाची व साथींच्या आजाराची लागण झालेल्या रुग्णांची संख्या वाढत आहे. उपचार सुरू असलेल्या रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले. डेंग्यूसदृश साथीचे रुग्ण सापडले असताना महापालिकेच्या आरोग्य विभागाने याची दखल घेतलेली नाही. साथींच्या आजाराचे सर्वेक्षण करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत, मात्र डेंग्यू तापाचा रुग्ण नसल्याचे डॉ. सुनील आंबोळे यांनी सांगितले. खासगी रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी डेंग्यूची लागण झालेल्या रुग्णांची नावे महापालिकेच्या आरोग्य विभागाला कळविण्यात आल्याचे सांगितले. मात्र डॉ. आंबोळे यांनी, डेंग्यूचे रुग्ण असल्याचे समजले आहे, तथापि अधिकृत माहिती अद्याप माझ्यापर्यंत आली नसल्याचे सांगून कानावर हात ठेवले. महापालिका आरोग्य विभागाकडून डेंग्यू तापाच्या साथीकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याने मिरज व परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आल्याचे चित्र आहे. (वार्ताहर)
मिरजेतील चौघांना डेंग्यूसदृश ताप?
By admin | Updated: August 23, 2014 00:05 IST