कोकरूड : खुजगाव (ता. शिराळा) येथील रस्ता रुंदीकरणाच्या कामासाठी लोकांच्या राहत्या घरांची मोडतोड सुरू असून नुकसान झालेल्या नागरिकांना योग्य भरपाई देण्यात यावी तसेच काम सुरू असलेल्या ठिकाणी दिशादर्शक फलक नसल्याने अपघाताची संख्या वाढू लागली आहे.
पाचवड फाटा (कराड) ते कोकरूड या मार्गाच्या रूंदीकरणाचे काम सध्या सुरू आहे. या कामाची देखभाल दुरुस्तीचे काम वाठार येथील डीएचडी या कंपनीकडे आहे. खुजगाव येथे रस्त्यालगत असणारी घरे या तेरा मीटर रुंदीकरणात काढावी लागणार होती. त्याप्रमाणे घरमालकांनी आपली शेकडो वर्षांची घरे स्वतःहून काढली आहेत. त्यामध्ये लोकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून या लोकांना योग्य भरपाई मिळणे गरजेचे आहे. त्यातच रस्त्याचे काम करणाऱ्या कंपनीने सांगली जिल्हा हद्दीतील आटूगडेवाडीपासून कोकरूडपर्यंतचा दुतर्फा रस्ता उकरून ठेवला आहे. काही ठिकाणी डांबर टाकले आहे तर काही ठिकाणी अर्धवट रस्ता सोडला आहे. मात्र समोरून येणाऱ्या वाहनचालकास दिशादर्शक फलक नसल्याने अपघात होत आहेत. ठेकेदाराने काम सुरू असलेल्या सर्व ठिकाणी दिशादर्शक फलक लावावेत तसेच रस्त्यावर पसरलेली खडी बाजूला करण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.