सांगली : आठवड्यात तापमानात होत असलेली वाढ आणि मर्यादित आवक असल्यामुळे आठवडीबाजारावर परिणाम दिसून येऊ लागला आहे. भाजीपाल्यांचे दर आवाक्यात असले तरी आवश्यक असलेल्या भाज्यांची आवक कमी होत आहे. फळांच्या दरात मात्र या आठवड्यात वाढ दिसून येत आहे. किराणा साहित्याच्या दरात काहीशी स्थिरता असली तरी गहू, ज्वारीसह धान्याचे दर काहीसे वाढले आहेत.
भाजीपाल्यात वांगी, दोडका, फ्लॉवर, कोबीचे दर स्थिर आहेत, तर या आठवड्यात प्रथमच लसूणदरात घट झाली आहे. कांदादरही स्थिर आहेत.
चौकट
फळांची आवक वाढतेय
या आठवड्यात फळांची आवक चांगली असून पुन्हा एकदा सफरचंदाची आवक चांगली आहे. कलिंगडाची तर विक्रमी आवक होत आहे. गोडवा असलेली द्राक्षेही आता बाजारात उपलब्ध आहेत. त्यामुळे कलिंगड, द्राक्षे, स्ट्रॉबेरीची आवक होत आहे.
चौकट
लसूण आवाक्यात, भाज्या महागल्या
या आठवड्यात पहिल्यांदाच कांदा, लसणाचे दर कमी झाले आहेत. मात्र, येत्या पंधरवड्यात पुन्हा एकदा लसणाचे दर वाढण्याची शक्यता आहे. भाज्या मात्र आवक घटल्याने दर वाढले आहेत.
चौकट
धान्याचे दर वाढतेच
गेल्या दीड महिन्यांपासून धान्याच्या दरात हाेत असलेली वाढ अद्यापही कायम आहे. या आठवड्यातही गहू, बाजरी, ज्वारीसह तांदळाचेही दर वाढले आहेत. नवीन हंगामातील धान्य बाजारात आल्यानंतर काहीसे दर कमी होण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
कोट
उन्हाळ्यामुळे बाजारात येणाऱ्या भाज्या कमी झाल्या आहेत. तरीही, दर अजूनही स्थिर आहेत. दरवाढ होण्याची शक्यता नसली तरी ग्राहकांकडून मागणीवरही मागणी कमी दिसत आहे. बाजारावरील परिणाम आता सुरूच राहणार आहे.
सचिन गिडडे, विक्रेते
कोट
मध्य प्रदेशसह उत्तर भारतातून सध्या गव्हाची चांगली आवक होत आहे. त्यामुळे अगदी २६०० पासून ३२०० रुपये प्रति क्विंटल दराने उपलब्ध झाली आहे. किराणा मालाच्या दरात स्थिरता असली, तरी काहीशी उदासीनता बाजारपेठेवर दिसून येत आहे.
संतोष पोरे, व्यापारी
कोट
धान्याचे दर वाढत आहेत. भाज्यांचे दर कमी होऊन काही उपयोग नाही. किराणा दरातही काहीसा दिलासा मिळायला हवा. मात्र, तो मिळत नाही. गॅसची दरवाढ आणि आता ही दरवाढ अडचणीची ठरत आहे.
सुनीता भोसले, गृहिणी