पलुस-कडेगाव मतदारसंघात सध्या कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम, आमदार माेहनराव कदम, आमदार अरुण लाड प्रतिनिधित्व करीत आहेत. याचबराेबर माजी आमदार पृथ्वीराज देशमुख, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख गट सक्रिय आहे. कोरोना संकटकाळात कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम कोरोनाविरोधी लढाईत प्रत्यक्ष मैदानात उतरले आहेत. मंत्री म्हणून माेठी जबाबदारी असतानाही मतदारसंघातील उपचारांच्या साेयीसुविधांवर त्यांचे लक्ष आहे. प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून आढावा घेऊन गावोगावी कोरोना नियंत्रणाच्या उपाययोजना राबवित आहेत. कडेगाव येथे त्यांनी भारती विद्यापीठ आणि भारती रुग्णालयाच्या माध्यमातून प्रत्येकी ३० बेडचे कोविड केअर सेंटर सुरू केले आहे. याशिवाय बेड उपलब्धतेनुसार सांगली आणि पुणे येथील भारती रुग्णालयातही येथील रुग्णांना उपचार सुविधा दिल्या जात आहेत. दोन्ही तालुक्यांतील कोविड रुग्णालये व कोरोना सेंटर्सना ते प्रत्यक्ष भेटी देत आहेत.
गावोगावी लॉकडाऊन व खबरदारीच्या उपाययोजना राबविल्या जात आहेत. यामध्ये आमदार मोहनराव कदम यांचे मार्गदर्शन मोलाचे ठरत आहे. आपत्ती व्यवस्थापन समितीशी चर्चा करून त्यांनी गावोगावी कडक लॉकडाऊनबाबत घेतलेली भूमिका संसर्ग राेखण्यामध्ये मोलाची ठरत आहे. सोनहिरा कारखान्याच्या माध्यमातून त्यांनी चिंचणी येथील कोरोना केअर सेंटर व ग्रामीण रुग्णालयात वेळोवेळी आवश्यक त्या सुविधा व उपकरणे दिली आहेत. आमदार फंडातून पलुस व येथील चिंचणी ग्रामीण रुग्णालयाला अत्याधुनिक रुग्णवाहिका देण्यात आल्या आहेत.
जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख हेही या संकट काळात कोरोनाबाधित रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबीयांना मदतकार्यातून धीर देत आहेत. अत्यवस्थ रुग्णांना बेड मिळवून देण्यासाठी वेगवेगळ्या रूपाने त्यांची मदत होत आहे. लसीकरणाचे योग्य नियोजन व्हावे, यासाठी त्यांचे प्रयत्न आहेत.
आमदार अरुण लाड यांनीही आपल्या स्वीय निधीतून सांगली, सातारा, सोलापूर, कोल्हापूर, पुणे या जिल्ह्यांसाठी एक कोटी रुपयांचे व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर दिले आहेत. राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांकडून प्रत्येक आरोग्य केंद्रावर सुरक्षा किटचे वाटप करण्यात येत आहे. राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा बँकेचे संचालक महेंद्र लाड, ऋषिकेश लाड यांनी पोलीस, डॉक्टर्स यांना मास्क, सॅनिटायझरचे वाटप केले. संग्राम उद्योग समूहाचे प्रमुख नूलेश येसुगडे यांनीही सामाजिक कामातून कोरोना योद्ध्यांना बळ देण्याचा प्रयत्न केला आहे.
चाैकट
उपचार सुविधांसाठी सर्व समाजघटकांची वज्रमूठ हवी
सध्या ऑक्सिजनची कमतरता भासत आहे. यासाठी तालुक्यातील व्यापारी, सहकारी, खासगी संस्था यांनी पुढाकार घेऊन आरोग्य केंद्रांना ऑक्सिजन, तसेच इतर सुविधा मिळवून देण्यासाठी एकत्रित वज्रमूठ बांधणे आवश्यक आहे. यातून सामान्यांना परवडेल, असे उपचार होणे आवश्यक आहे.
- प्रतिनिधी