ते म्हणाले की, जिल्हा परिषद शाळांचा दर्जा सुधारण्यासाठी विशेष प्रयत्न सुरू आहेत. शाळा खोल्यांसह पिण्याचे पाणी, खेळाचे मैदान आदी मूलभूत सुविधा दिल्या तरच तेथील गुणवत्ता वाढणार आहे. म्हणूनच जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांचे सर्वेक्षण करून जिल्हा नियोजनमधून ३०० शाळा खोल्यांची कामे मंजूर केली आहेत. २५ कोटींचा निधीही मिळाला आहे. या कामांच्या निविदा तातडीने फेब्रुवारी २०२१ मध्ये केल्यामुळे कामे तात्काळ पूर्ण होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. बहुतांश ठेकेदारांना कामे सुरू करण्याचे आदेशही दिले आहेत. प्रति शाळा खोल्यांसाठी शासनाकडून साडेआठ लाखांची रक्कम मंजूर आहे. प्रत्येक्षात कामातील भ्रष्टाचारी यंत्रणा मोडीत काढल्यामुळे काही प्रामाणिक ठेकेदारांनी १५ ते १६ टक्के दराने कामे करण्याची तयारी ठेवली आहे. यामुळे शासनाचे लाखो रुपये वाचणार आहेत. या ठेकेदारांनी दर्जेदार शाळा खोल्यांची कामे करण्याचे आश्वासन दिले आहे. शाखा अभियंता, उपकार्यकारी अभियंता यांना दर्जेदार कामे करून घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. ठेकेदारांनी वेळेत कामे सुरू करून ती पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहेत. वेळेत काम सुरू न केल्यास संबंधित ठेकेदारास काळ्या यादीत टाकणार आहे. तसेच प्रसंगी शासनाची फसवणूक केली, म्हणून गुन्हाही दाखल करण्यात येणार आहे, असा इशाराही डुडी यांनी दिला आहे.
चौकट
जिल्ह्यात ‘माझी शाळा-आदर्श शाळा’ अभियान राबविण्यात येत आहे. यात १४१ शाळांची निवड केली आहे. याठिकाणी भौतिक सुविधांबरोबर शिक्षणाची गुणवत्ता वाढविण्यावर भर दिला जाणार आहे. या शाळांमधील काही कामे सुरू झाली असून शौचालये, पिण्याची पाण्याची व्यवस्था दर्जेदार केली आहे. कामाचा दर्जाही उत्तम आहे, असेही जितेंद्र डुडी यांनी सांगितले.