विटा : घरात झाडलोट करीत असताना भांडण करून अपमान केल्यामुळे लेंगरे (ता. खानापूर) येथील पोलीस पत्नी उजिता जोतिराम शिंदे (वय ३२) व तिची मुले रिया (६) आणि रियांश ऊर्फ केदारनाथ (एक वर्ष) यांच्या आत्महत्येस कारणीभूत असल्याप्रकरणी उजिता यांची सासू चंदाबाई नारायण शिंदे (रा. लेंगरे) हिच्याविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
याबाबतची फिर्याद मृत विवाहितेचे वडील अशोक संतू आतकरी (रा. कलेढोण, ता. खटाव, जि. सातारा) यांनी सोमवारी विटा पोलिसांत दिली.
अमरावती येथे राज्य राखीव पोलीस दलात कार्यरत असलेले जोतिराम शिंदे यांची पत्नी उजिता यांनी त्यांच्या दोन लहान मुलांसह दि. १४ मे रोजी रात्री अकराच्या सुमारास लेंगरे येथील विहिरीत उडी टाकून आत्महत्या केली होती. विटा पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन उत्तरीय तपासणीनंतर या तिन्ही माय-लेकरांचे मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात दिले. शनिवारी या तिघांवर माहेरच्या नातेवाइकांसमक्ष अंत्यसंस्कार करण्यात आले होते.
सोमवारी रक्षाविसर्जन कार्यक्रम झाल्यानंतर उजिता हिचे वडील अशोक आतकरी यांनी फिर्याद दिली. उजिता दि. १४ रोजी दुपारी घरातील झाडलोट करीत असताना सासू चंदाबाईने तिच्याशी भांडण करून तिचा अपमान केला. या कारणामुळे उजिताने रात्री रिया व रियांश यांना घेऊन विहिरीत उडी टाकून आत्महत्या केली. तिघांच्या आत्महत्येस कारणीभूत असल्याचे त्यात म्हटले आहे. सासू चंदाबाईविरुद्ध विटा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस निरीक्षक संतोष डोके पुढील तपास करीत आहेत.