सांगली : महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण (मोक्का) कायद्यांतर्गत कारवाई करण्याची धमकी देऊन दीड लाखाची खंडणी मागितल्याप्रकरणी सांगलीच्या तत्कालीन पोलीस उपअधीक्षक कविता नेरकर, सहायक पोलीस निरीक्षक घन:श्याम बळप व कर्मचारी आकीब काझी या तिघांविरुद्ध अखेर विश्रामबाग पोलिसांत आज, सोमवारी गुन्हा दाखल करण्यात आला. मुख्य न्यायदंडाधिकारी एम. एम. देशपांडे यांच्या आदेशावरून हा गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत नालसाब मौलाली मुल्ला (रा. गुलाब कॉलनी, शंभरफुटी रस्ता, सांगली) यांनी न्यायालयात फिर्याद दाखल केली होती. सहा महिन्यांपूर्वी नालसाब मुल्ला, त्यांचे बंधू मुश्ताक व राजू मुल्ला यांच्याविरुद्ध विश्रामबाग पोलीस ठाण्यात सावकारीचा गुन्हा दाखल झाला होता. यातील राजू यांना अटक केली होती. त्यानंतर नालसाब यांना उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला होता, तर मुश्ताक यांना अटक करण्यापूर्वी ७२ तास अगोदर नोटीस देण्याचा आदेश उच्च न्यायालयाने पोलिसांना दिला होता. दरम्यानच्या काळात सांगली न्यायालयाने मुश्ताक यांना तात्पुरता अटकपूर्व जामीन मंजूर केला होता. न्यायालयाच्या निकालानंतर बळप व काझी यांनी मुल्ला बंधूंना पोलीस ठाण्यात बोलावून घेतले होते व ‘तुम्हाला मोक्का कायदा लावून आयुष्यातून उठवू’, अशी धमकी देऊन दीड लाख रु मागितले. पैशाची ही मागणी नेरकर यांच्यासमोर झाली होती, असा आरोप मुल्ला बंधूंनी फिर्यादीत केला आहे. बळप यांनी एक लाख रु घेतलेही होते. उर्वरित रक्कम न दिल्याने मुश्ताक यांना डांबून त्यांची दुचाकी काढून घेतली होती, असेही फिर्यादीत म्हटले आहे. यानंतर नालसाब यांनी या तिघांविरुद्ध न्यायालयात फिर्याद दाखल केली होती. चार दिवसांपूर्वी न्यायालयाने येत्या २० नोव्हेंबरपर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण करून त्याचा अहवाल सादर करण्याचा आदेश दिला होता. त्यानुसार नेरकर, बळप व काझी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.नेरकरांची नियुक्ती पुण्यात कविता नेरकर यांची तीन महिन्यांपूर्वी पुण्याला बदली आहे. बळप सध्या पोलीस मुख्यालयातील जिल्हा विशेष शाखेत नियुक्तीस आहेत, तर काझी विश्रामबाग पोलीस ठाण्यात आहेत. तिघांविरुद्ध दाखल झालेल्या गुन्ह्याचा तपास मिरजेतील पोलीस उपअधीक्षक बजरंग बनसोडे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.
नेरकरसह तिघांवर खंडणीचा गुन्हा न्यायालयाचा आदेश : मोक्काप्रकरणी
By admin | Updated: September 15, 2014 23:48 IST