लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : लॉकडाऊनमध्ये शाळा बंद झाल्या. मुलांच्या वाट्याला सक्तीचा घरकोंबडेपणा आला. त्याचे परिणाम जाणवू लागले आहेत. दिवसभर अखंड खाणे, ऑनलाइन गेम खेळणे आणि मनसोक्त झोपणे यामुळे मुले गब्दुल्ली होऊ लागली आहेत.
कोरोनाकाळात शाळा, क्रीडांगणे, उद्याने बंद असल्याने स्थूलता वाढत आहे. कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेत स्थूल मुलांना संसर्गाची शक्यता जास्त असल्याचे सांगितले जात आहे, त्यामुळे पालकांसाठी ही चिंतेची बाब ठरली आहे. त्यांची स्थूलता घर घर की कहानी बनली आहे. मुलांचे वजन प्रमाणाबाहेर वाढू नये याकडे लक्ष देण्याचा सल्ला डॉक्टर देत आहेत.
शासनानेही याची गंभीर दखल घेतली आहे. आशा कार्यकर्त्यांनी आपापल्या भागात अशा मुलांकडे विशेष लक्ष द्यावे, काही गंभीर लक्षणे आढळल्यास माहिती त्वरित देण्यास सांगितले आहे. आशा कार्यकर्त्यांकडील तक्त्यामध्ये मुलांच्या नाडीचे ठोके, श्वसनाची गती, लघवीचे प्रमाण, प्राणवायूची पातळी नोंदवण्यास सांगितले आहे. रक्तदाब, हृदयविकार, मधुमेह, प्रतिकारशक्तीचा अभाव तसेच फुप्फुसांचे विकार, मूत्रपिंड व यकृताचा त्रास, लठ्ठपणा असणाऱ्या मुलांमध्ये कोरोनामुळे गंभीर गुंतागुंत होऊ शकते, याचीही दखल शासनाने घेतली आहे. मध्यमवर्गीय आणि उच्च सामाजिक-आर्थिक गटांमधील मुलांमध्ये स्थूलता आली आहे. लॉकडाऊनमुळे मुलांना घरात अडकून राहावे लागत आहे. सोबतच बिस्किट, नूडल्स, आईस्क्रीम, केक्स आणि गोड पेय पदार्थ अशा आहारामुळेही स्थूलता वाढलीय.
बॉक्स
वजन वाढले कारण...
- शाळा, मैदाने, उद्याने बंद राहिल्याने मुलांच्या हालचालींवर मर्यादा आल्या. घर म्हणजेच संपूर्ण जग झाले. शारीरिक कसरती पूर्ण थांबल्या.
- सतत घरात राहण्याने खाण्याचे प्रमाण वाढले. जेवणाशिवाय इतर वेळेत दिवसभर फास्ट फुडचा मारा होत राहिला.
- दिवसभर टीव्ही किंवा मोबाइलवर ऑनलाइन अभ्यास सुरू होता. त्याच्या सोबतीला खाणे अखंड सुरू असते.
- शाळा, शिकवणीवर्ग बंद असल्याने मुलांच्या झोपेचा कालावधी सरासरी ८ तासांवरून बारा तासांपर्यंत लांबला. दुपारची झोपही सुरू झाली.
बॉक्स
वजन कमी करण्यासाठी ही घ्या काळजी...
- बाहेरील फास्ट फुडला घरगुती पदार्थांचा पर्याय द्या. दररोजचे वेगवेगळे मेन्यू मुलांना आकर्षित करतील. विशेषत: हॉटेल्स व बेकरीच्या पदार्थांपासून दूर ठेवतील.
- मुलांच्या हालचाली वाढवण्यासाठी टीव्ही, मोबाइलवर मर्यादा आणा. ऑनलाइन अभ्यासाव्यतिरिक्त इतर वेळेत घरच्या घरी शारीरिक खेळांना प्रोत्साहन द्या. घरच्या बागेत, टेरेसवर किंवा अंगणात टेनिस, बॅडमिंटन, क्रिकेट असे खेळ खेळता येतील.
- मुलांचा दंगा टाळण्यासाठी दुपारी त्यांना सक्तीने झोपवण्याचा प्रयत्न होतो, तो टाळा. दुपारची झोप वजन वाढवते, शिवाय रात्री उशिरा जागरणांना पाठबळ देते.
कोट
मुले टीव्ही, मोबाइल सोडतच नाहीत...
मुलांना घरात दिवसभर अभ्यास एके अभ्यास शक्य होत नाही. खेळण्यासाठी घराबाहेर जाता येत नाही. अंगणात खेळण्यावर मर्यादा आहेत, शिवाय मित्र-मैत्रिणींची संगतही नाही. त्यामुळे मुले दिवसभर मोबाइल व टीव्हीला चिकटून असतात. लॉकडाऊनने हा मोठा दुष्परिणाम पालकांसमोर आणला आहे.
- धैर्यशील कापसे, पालक, मिरज
आम्ही पालक ड्युटीवर जातो तेव्हा मुलांसाठी मोबाइल व टीव्ही हेच कुटुंबातील सोबती बनतात. मोबाइलचे व्यसन कसे सोडवायचे ही चिंता तर आहेच, पण त्यांच्या मैदानी ॲक्टिव्हिटीदेखील थंडावल्याची काळजी लागून राहिली आहे.
- वैष्णवी जतकर, पालक, सांगली
कोट
मुलांसोबत मूल होऊन खेळा...
गेल्या दीड वर्षात मुलांचे वजन सरासरी साडेतीन किलोंनी वाढल्याचे निरीक्षण आहे. त्यावर नियंत्रण ठेवायचे तर मोबाइलच्या व्यसनातून त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करा. मुलांच्या वयानुसार शारीरिक व्यायामाचे खेळ घरच्या घरी खेळा. बाहेरील फास्ट फुड प्रकर्षाने टाळा. मुलांच्या वजनावर नियमित लक्ष ठेवा. मसालेदार अन्न आहारातून बाजूला काढा.
- डॉ. केतन गद्रे, बालरोग तज्ज्ञ, सांगली
मैदाने बंद असली तरी घरच्या अंगणात खेळ खेळता येतील. लॉकडाऊनमुळे सुदैवाने पालकांनाही वेळ उपलब्ध आहे, त्यामुळे मुलांसोबत मूल होऊन खेळण्याचा प्रयत्न करा. मोबाइल आणि टीव्हीऐवजी वृत्तपत्रे, पुस्तके वाचनाची सवय लावा. परसबाग फुलवणे, घरची छोटी-मोठी कामे करवून घेणे यामुळेही मुलांची हालचाल वाढून स्थूलतेची समस्या निर्माण होणार नाही.
- अर्चना मुळे, समुपदेशक, सांगली