इस्लामपूर : वाळवा तालुक्यात कोरोनाचा विस्फोट थांबत नसल्याचे चित्र आहे. गुरुवारी तालुक्यात एकूण २३३ नवे कोरोनाबाधित रुग्ण सापडले. ग्रामीण भागात १६३ तर शहरी भागात ही संख्या ७० इतकी होती. यामध्ये इस्लामपूर शहरातच तब्बल ६१ रुग्ण बाधित सापडले आहेत तर आष्टा शहरात ९ जण बाधित आढळले आहेत.
तुजारपूरमध्ये एकाच कुटुंबातील आठजण कोरोनाबाधित झाले आहेत. तालुक्यामध्ये नुकत्याच कृष्णा कारखान्याच्या निवडणुकीचा हंगाम पार पडला आहे. या निवडणुकीच्या काळात कोरोनाबाबत असणाऱ्या सर्व नियमावली पायदळी तुडवत मोठ्या गर्दीच्या सभा झाल्या होत्या. अगदी शेवटच्या टप्प्यात प्रशासनाने मोरगाव, रेठरे हरणाक्ष, नेर्ले येथे नियमावलीचा भंग करून सभा घेतल्याचा ठपका ठेवत चार सभांच्या आयोजकांवर गुन्हे दाखल करण्याचा सोपस्कार पार पाडला. याशिवाय अन्य कोणतीही कठोर कारवाई प्रशासनाकडून केली गेली नाही.
तीन दिवसांपूर्वी तर तालुक्यातील कोरोनाबाधितांची संख्या ३२३ अशी आजवरची जिल्ह्यातील उच्चांकी रुग्णसंख्या ठरली. कोरोनाचे छुपे स्प्रेडर फिरत राहिल्याने कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात बळावला आहे. त्यातच जे कोरोनाबाधित घरीच अलगीकरणात राहिले आहेत, त्यांच्याकडूनही संपूर्ण कुटुंबाला कोरोनाच्या खाईत लोटले जात असल्याचे चित्र आहे. संस्थात्मक विलगीकरण कक्ष तालुक्याच्या अनेक गावात स्थापन करण्यात आल्याचे प्रशासनाकडून सांगितले जात आहे. मात्र, या संस्थात्मक विलगीकरण कक्षात कोरोनाबाधित रुग्ण जात नाहीत. त्यामुळेच कोरोनाचा हा विस्फोट कमी होण्याची चिन्हे दिसून येत नाहीत.
चाैकट
या गावांत अधिक धोका
ग्रामीण भागातील येडेमच्छिंद्र, कासेगाव, नेर्ले, बहे, सुरुल, ओझर्डे, पेठ, इटकरे, ऐतवडे खुर्द, तांदूळवाडी, येडेनिपाणी, भडकंबे, बावची, मर्दवाडी, बोरगाव, गौंडवाडी, साखराळे अशा गावांमधूनही कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याचे चित्र आहे. प्रशासनाने आता तरी कठोर पावले उचलून कोरोना संसर्गाला आळा घालण्यासाठी लसीचा वापर करण्याची गरज निर्माण झाली आहे.