सांगली : समाजात वेगवेगळे वैचारिक प्रवाह निर्माण होत असताना, आपल्या पुस्तकातून हिंदू-मुस्लिम संस्कृतीचा आढावा घेत त्याचा मिलाफ साधणारे साहित्यिक सय्यद अमीन यांचा आदर्श जपणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांनी रविवारी केले. माजी आमदार व ज्येष्ठ साहित्यिक सय्यद अमीन यांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित सलोखा साहित्य संमेलनात जिल्हाधिकारी गायकवाड बोलत होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ समीक्षक प्रा. वैजनाथ महाजन होते. गायकवाड पुढे म्हणाले, भारतीय समाजाचा विशेषत: हिंदू-मुस्लिम समाजातील संस्कृतीचा विचार करता, त्यात साम्यता दिसून येते. एकरूप झालेला समाज म्हणूनही याकडे पाहिले जाते. सांस्कृतिक चळवळ पुढे गेल्यास राजकीय पक्षांच्या माध्यमातून मांडण्यात येणारे प्रश्न आपसुकपणे मागे पडत असतात. आपल्या लिखाणातून हिंदू-मुस्लिम संस्कृतीचा मिलाफ साधणाऱ्या अमीन यांनी समाजाला वरच्या स्तरावरचा विचार करायला लावला. त्यांच्या साहित्याचे पुनर्मुद्रण होणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगीतले. यावेळी सय्यद अमीन यांच्या ‘हिंदू-मुस्लिमांचा सांस्कृतिक मिलाफ’ या पुस्तकावर परिसंवादाचे आयोजन केले होते. यावेळी प्रा. वैजनाथ महाजन म्हणाले, आमदार असतानाही आपल्या वर्तणुकीत त्याचा प्रत्यय आणू न देता, साधे राहणीमान असलेले सय्यद अमीन हे आदर्शवत आमदार होते. त्यांच्या राहणीमानावरुन त्यांच्या विचारांची उंची समजत असल्याने, त्यांचे साहित्य उल्लेखनीय असेच आहे. त्यांनी मांडलेले विचार आजही प्रेरणादायी आहेत. या परिसंवादात डॉ. बी. डी. पाटील, प्राचार्य विश्वास सायनाकर यांनीही सहभाग घेतला. यावेळी सिकंदर अमीन, डॉ. नितीन पाटील, इरफान पेंढारी उपस्थित होते. (वार्ताहर)
हिंदू-मुस्लिम संस्कृतीचा साहित्यात मिलाफ
By admin | Updated: December 21, 2015 00:47 IST