अंजर अथणीकर- सांगलीजिल्ह्यात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली असून शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. मंगळवार (१८ आॅगस्ट) अखेर सरासरीच्या तुलनेत केवळ ५५ टक्केच पाऊस बरसला आहे. ऐन पावसाळ्यात ३१ टँकर सुरू करण्याची वेळ प्रशासनावर आली आहे. गेल्या दहा दिवसात टँकरची संख्या दहाने वाढली असून, आता दिवसेंदिवस टँकरला मागणी वाढत आहे. जिल्ह्यात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाल्याने पिण्याच्या पाण्यासाठी जिल्ह्यात ३१ टँकर सुरू करण्यात आले आहेत. या टँकरद्वारे २९ गावे व १९२ वाड्यांतील ७८ हजार ७१३ लोकसंख्येला पाण्याचा पुरवठा करण्यात येत आहे. त्याचबरोबर रोजगार हमी योजनांच्या कामांनाही मागणी वाढली आहे. या योजनेंतर्गत ४२४ कामे सुरू असून, ४ हजार ९४२ मजूर काम करीत आहेत. ४७ लाखाहून अधिक मजूर क्षमतेची जवळपास आठ हजार कामे मंजूर करून ठेवण्यात आली आहेत. आॅगस्टचा पंधरवडा उलटला तरी सरासरीच्या तुलनेत ५५ टक्केच पाऊस झाला आहे. पावसाने पूर्णपणे हुलकावणी दिल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. पिण्याच्या पाण्यासाठी आता विहीर अधिग्रहण सुरू करण्यात आले आहे. टंचाई आराखड्याचीही मुदत आता ३१ आॅगस्टपर्यंत वाढविण्यात आली आहे. एक हजार एकरमध्ये चारा घेणार!जिल्ह्यात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. जनावरांना चारा उपलब्ध करून देण्यासाठी जिल्ह्यातील एक हजार एकरामध्ये चारा घेण्याचे नियोजन जिल्हा प्रशासनाने केल्याची माहिती जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांनी दिली. शासनाकडून यासाठी बियाणांचा पुरवठा करण्यात येणार आहे. ज्या ठिकाणी म्हैसाळ, ताकारी व टेंभू, आरफळ योजनांचे पाणी आहे, अशा पट्ट्यात चारा घेण्यात येणार आहे. याची विक्री मात्र शेतकऱ्याला करावी लागणार आहे. उपलब्ध चारा पॅकिंगमध्येही उपलब्ध करून दिला जाणार आहे. चारा छावण्यांपेक्षा ही पध्दत सोयीची होणार आहे. येत्या आठ दिवसात पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. त्याच्या प्रतीक्षेत आम्ही आहोत. उन्हाळ्यातील चटके पावसाळ्यातदिवसेंदिवस उन्हाची तीव्रता वाढत आहे. जवळपास कमाल तापमान ३० अंशापर्यंत जात आहे. गेल्या आठ दिवसात किमान तापमान २२ ते २३ अंश असून, कमाल तापमान २८ ते ३० अंशादरम्यान आहे. मंगळवारी कमाल तापमान ३०.७, तर किमान तापमान २२.२ अंश इतके राहिले. उन्हाच्या तीव्रतेने पाणीसाठाही वेगाने कमी होत आहे.
ढग हटले, दुष्काळाचे संकट दाटले...
By admin | Updated: August 18, 2015 22:51 IST