सांगली : मुलांची इच्छा नसूनही त्यांचे पालकच त्यांना रस्त्यावर भीक मागण्यासाठी पाठवित असल्याची धक्कादायक माहिती एकलव्य विशेष प्रशिक्षण केंद्राच्या (बालकामगार शाळा) सर्व्हेतून पुढे आली आहे. या केंद्राने अशा मुलांच्या मदतीसाठी पुढाकार घेतला आहे. त्यांना प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न केले जातील, तसेच त्यांना शाळेत दाखल करण्याची जबाबदारी पार पाडली जाईल, अशी माहिती केंद्राचे अध्यक्ष शिवाजी त्रिमुखे यांनी ‘लोकमत’ला दिली.कर्नाटकातील मुलांचा सांगलीत भीक मागण्यासाठी वापर केला जात असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने आज (बुधवार) प्रसिद्ध केले होते. हे वृत्त वाचून अनेकांच्या मनाला चटका लागला. काही वस्त्यांमधून अशा मुलांना भीक मागण्यासाठी दबाव आणला जातो. लहान मुलांचा अशाप्रकारे छळ होत असल्याची बाब उजेडात आली. सामाजिक संघटना आता यासाठी पुढे येत आहेत. त्रिमुखे म्हणाले की, मिरजेतील रेल्वे पुलाजवळील मारुती मंदिराजवळ काही लोक वस्ती करुन राहिले आहेत. या वस्तीतील मुलेच भीक मागण्यासाठी सांगलीत येतात. त्यांचे गाव कर्नाटकात आहे. मुलांना पाहून लोक भीक देतात, असा पालकांचा समज झाला आहे. या मुलांची शाळेत जाण्याची, खेळण्या-बागडण्याची इच्छा आहे. मात्र पालकांपुढे ते हतबल आहेत. मुलांची ताकद त्यांच्यासमोर कमी पडत आहे. त्यामुळे पालक सांगतील तसेच ते वागतात. भीक मागून ते सांगलीतून मिरजेला चालत जातात. या मुलांना शाळेत घेण्यासाठी आम्ही प्रयत्न करु. यासाठी पोलीस व प्रशासनाची मदत घ्यायला लागली तरी हरकत नाही. यासाठी सामाजिक संघटनांनी मदत करावी, असे आवाहन त्यांनी केले. (प्रतिनिधी)
भीक मागणाऱ्या मुलांसाठी बालकामगार शाळेचा पुढाकार
By admin | Updated: July 31, 2014 00:11 IST